शिरपूर : महिलांंनी पूर्णपणे सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच महिलांच्या संरक्षणासाठी कायद्यात मोठ्या प्रमाणात तरतुदी असून महिलांनी खंबीरपणे जीवन व्यतीत करावे. आपण सक्षम होऊन संपूर्ण कुटुंबाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपण नेहमी सत्कृत्य करावे, कुटुंबातील सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करावा, महिलांवर अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कायद्यात त्यांच्या संरक्षणासाठी तरतूद आहे. कुटुंबाला पुढे नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने महिलांनी न डगमगता प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे व श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ एन. एम. आय. एम. एस. शिरपूर कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने "कायद्याच्या जनजागृतीतूून महिलांचे सक्षमीकरण" या विषयावर महिलांचे संरक्षण कायदे संदर्भात जनजागृती शिबिर संपन्न झाले. बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे) यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचे संरक्षण कायदे संदर्भात जनजागृती शिबिर श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ एनएमआयएमएस शिरपूर कॅम्पसमधील ऑडिटोरियम हॉल येथे घेण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे, सह दिवाणी न्यायाधीश व्ही. बी. शितोळे, दिवाणी न्यायाधीश एस. एस. देशमुख, दिवाणी न्यायाधीश डॉ. डी. यू. डोंगरे, ऍड. रसिका निकुंभ, ऍड. शांताराम के. महाजन विराजमान होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायद्याचे स्वरूप स्पष्ट करुन सखोल मार्गदर्शन केले
सुरुवातीला एस. व्ही. के. एम., एनएमआयएमएस शिरपूर कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. आर. एस. गौड यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल, देशभरातील शैक्षणिक विस्तार व व्हिजनरी व्यक्तिमत्त्व माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विस्तृतपणे विवेचन केले.
प्रस्ताविकात दिवाणी न्यायाधीश डॉ. डी. यू. डोंगरे (दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे) यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून मार्गदर्शन केले.
ऍड. श्रीमती रसिका निकुंभ (सहायक सरकारी वकील तसा तज्ज्ञ मार्गदर्शक धुळे) यांनी "फौजदारी कायद्यातील महिलांविषयी तरतुदी" या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून महिलांसाठी सक्षमीकरणाच्या तरतुदी स्पष्ट केल्या.
ऍड. शांताराम के. महाजन (अध्यक्ष, शिरपूर तालुका वकील संघ) यांनी "महिला सक्षमीकरणाची गरज" या विषयावर विस्तृत विवेचन केले.
न्या. व्ही. बी. शितोळे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर शिरपूर) यांनी "हिंदू विवाह कायदा" याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
न्या. एस. एस. देशमुख (दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर शिरपूर) यांनी "हिंदू वारसा कायदा" या विषयावर विस्तृतपणे विश्लेषण करून माहिती दिली.
यावेळी सोशल डिस्टनसिंग चे काळजीपूर्वक पालन करुन कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला शिरपूर तालुक्यातील अनेक वकील, विविध महाविद्यालयांचे प्राचार्या, मुख्याध्यापिका, प्राध्यापिका, विविध विभाग प्रमुख, कर्मचारी, महिला, पुरुष, पदाधिकारी उपस्थित होते.
यशस्वीरित्या संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिवाणी न्यायाधीश डॉ. डी. यू. डोंगरे, श्री. जिरे, एस. व्ही. के. एम., एनएमआयएमएस शिरपूर कॅम्पसचे मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे आणि एम. पी. टी. पी. शिरपूर कॅम्पसचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
