वीज कंपनीने ग्राहकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित करावा : अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे धुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न



 

धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : वीज कंपनीने ग्राहकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करावा. परिषदेत मांडण्यात आलेल्या विविध सूचनांची दखल घेत त्यांचा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करीत वेळोवेळी आढावा घ्यावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी धुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी कुबेर चौरे, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, ग्राहक संरक्षण परिषदेत सदस्यांनी वीज कंपनीविषयी विविध प्रश्न मांडले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील बैठकीपर्यंत या प्रश्नांची सोडवणूक करून अहवाल सादर करावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावातील त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभागाने उपविभागीय अधिकारी संबंधित तालुक्यातील तहसीलदारांच्या समन्वयातून त्रुटींची पूर्तता करावी. उपप्रादेशिक परिवहन विभागाने रुग्ण वाहिकांवरील हॉर्नच्या आवाजाचा आढावा घेवून रुग्ण वाहिका चालकांचे समुपदेशन करावे.

            पुढील महिन्यात दिवाळीचा सण येत असून अन्न औषध प्रशासन विभागाने दक्ष राहावे. आवश्यक तेथे पोलिसांची मदत घेवून अन्न पदार्थांचे नमुने घेवून कारवाई करावी. तसेच नमुन्यांचा अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करावा. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार श्वान निर्बिजीकरणाची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करावी, अशाही सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी यावेळी दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेत समितीचे सदस्य रतनचंद शहा, डॉ. योगेश सूर्यवंशी, आलोक रघुवंशी, मधुकर बागूल, डॉ. श्रीराम महाजन, गुलाब पाटील आदी सदस्यांनी भाग घेत कृषी, प्रधानमंत्री पीक विमा, सौर ऊर्जा पंप, अन्नधान्य वितरण, पतसंस्थांमधील ठेवी आदी विषयांवर विविध सूचना केल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिसाळ यांनी प्रास्ताविक करून आभार मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने