जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा




नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.12:-  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  मोहिमेचा आढावा घेतला.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य ‍चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते. 

डॉ.भारुड म्हणाले, खाजगी दवाखान्यातील ताप व खोकला असलेल्या प्रत्येक रुग्णाचे स्वॅब नमुने संकलीत करावे. कोरोना बाधित असलेल्या गावात स्वॅब चाचणीसाठी शिबिराचे आयोजन करावे व त्यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रतिष्ठीत नागरिकांचे सहकार्य घ्यावे.  कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी वेळेत होईल याकडे लक्ष द्यावे. कोविड केअर सेंटरच्या स्वच्छतेकडे लक्ष  द्यावे. 

‘माझे कुटुंब..’ मोहिमेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  काही भागांना भेट देऊन आरोग्य तपासणीबाबत आढावा घ्यावा. सर्वेक्षण करताना काही व्यक्ती बाहेर गावी गेल्याचे आढळल्यास त्या घराला दुसऱ्यांदा भेट देऊन माहिती घ्यावी. शहरी भागात आरोग्य तपासणीला अधिक वेग द्यावा. अतिजोखिमीच्या व्यक्तींची नोंद विशेषत्वाने घ्यावी व त्यांना दक्षतेच्या सूचना द्याव्यात. 

अधिकाऱ्यांनी आरोग्य पथकांसोबत नागरिकांच्या भेटी घ्याव्यात. गावातील कोरोनाबाबत सर्व परिस्थिती सर्वेक्षणातून स्पष्ट होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागात संबंधित अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य तपासणीचा आढावा घ्यावा. दुकाने, हॉटेल्स आदी आस्थापना व वाहतूक सुरू झाल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक पूर्वनियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने