शिरपूर - 26 ऑक्टोबर रोजी मौजे जळोद येथील आश्रम शाळेच्या पटांगणात अति दुर्मिळ अल्बिनो घोणस (कातडक्ष/ वर्णहीनता असलेला- इंडियन रसेल वाइपर) हा साप आढळून आला. संस्थाध्यक्ष मा श्री संजय अशोक मंडलिक यांनी स्थानिक सुप्रसिद्ध सर्पमित्र श्री दिनेश बोरसे यांना याबाबत माहिती दिली. तात्काळ श्री बोरसे घटनास्थळी पोहोचले . त्यावेळी तीन फूट लांबीचा अति विषारी घोणस साप अतिशय शिताफीने धीर राखत बरणीत जेरबंद केला.
घोणस हा साप महाराष्ट्रात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक आहे. त्याच्या अंगावर साखळी सारख्या दिसणार्या तीन समांतर रेषा असतात. हा हिरवा , पिवळा , हलका ,करडा यासारख्या रंगछटांमध्ये आढळतो. परंतु याठिकाणी आढळून आलेला सर्प हा अल्बिनो म्हणजे वर्ण हीनता असलेला होता. घोणस या सापात अल्बिनो आढळून येणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. हा साप मुख्यत्वे जंगले तसेच ग्रामीण भाग पसंत करतो. हा सर्प विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. त्यामुळे काही वेळेस चावतांना हा साप विषारी दातांचा उपयोग करत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात. याचे फुत्कार कुकरच्या शिट्टी प्रमाणे असतात. या सापाचे विष अत्यंत जहाल आहे. ते मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. तात्काळ प्रति विषचे औषध न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. अशी माहिती श्री बोरसे यांनी माहिती घटनास्थळी दिली.
नागरिकांनी सर्प दिसल्यास घाबरून न जाता व त्याला ठार मारण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्रांना तात्काळ संपर्क करावा व निसर्गाच्या जैव साखळीतील या महत्वाच्या घटकाविषयी गैरसमज दूर करावेत असे आवाहन वन्यजीव बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश बोरसे यांनी केले.
जेरबंद घोणस सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडण्यात आले. त्यावेळी खजिनदार प्रमोद गायकवाड, प्रादेशिक वन विभाग आर एफ ओ श्री कालिदास सैंदाणे साहेब, तसेच अमोल बहिरम, योगेश सोळंकी, प्रफुल्ल बडगुजर, कुणाल ढोले, मुक्तार फकीर ,पक्षिमित्र श्री हेमराज पाटील रोहित माळी उपस्थित होते.
Tags
news
