प्रतिनिधी, शिरपूर
उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधमांना तत्काळ फाशी होणे आणि सदर प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात चालवण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने निवेदनाद्वारे तहसिलदारांमार्फत राष्ट्रपति व पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे केली. यावेळी आदिवासी टायगर सेनेनेही निवेदन दिले.
बीकेडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलेय की, देशात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान सुरू आहे. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेश राज्यात हाथरस व बलरामपूर येथे मुलींवर पाशवी अत्याचार करून निर्घूण हत्या करण्यात आली. या घटनेचा बिरसा क्रांती दल जाहिर निषेध नोंदवून सदर दोन्ही घटना अंगावर काटे आणणाऱ्या असून हाथरस येथील दलित मुलीची जीभ छाटण्यात आली तर बलरामपूर येथील घटनेत पिडीत मुलीचे पाय कापण्यात आले.त्या पिडीत मुलींना न्याय मिळावा म्हणून सदर प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात चालवून त्या दोघिंच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या पूर्वी उत्तर प्रदेशात दलित - आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार झालेले आहेत. देशात एट्रॉसिटीसारखा कायदा अधीक कडक केला असतांना देखील दिवसेंदिवस जातीय अत्याचार वाढत असून दलित - आदिवासी समुदाय सुरक्षित नसल्याचे या घटना साक्ष देतात. निवेदन देतेवेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा महासचिव वसंत पावरा, जिल्हा सल्लागार विलास पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, सचिव गेंद्या पावरा, समाधान ठाकरे, सागर मोरे, वसंत भील, दिलवरसिंग पावरा, मद्रास पावरा, सखाराम पावरा एटीसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाडवी आदी उपस्थित होते.
Tags
news
