शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील रामी परिसरातील पाण्याची समस्या भीषण असून मालपूर धरणातील वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याच्या माध्यमातून रामी परिसरातील शेतकऱ्यांना मिळाल्यास पाण्याच्या प्रश्न सुटण्यास मदतच होईल, अशी मागणी रामी परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्याकडे केली. आज मालपूर धरण व परिसरातील कालव्यांची पाहणी करुन धरणाच्या पाण्याचे पूजन श्री.साळुंके यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
यंदाच्या पावसाळ्यात रामी परिसरात पाऊस अत्यल्प झाला. त्यामुळे परिसरातील लहान-मोठे धरण, पाझर तलाव भरलेले नाही. परिणामी रामी व आजूबाजूच्या परिसरात पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली. थोड्याच दिवसापूर्वी मालपूर धरणातील पाणी विखरण वगैरे परिसरात सोडण्यात आले होते. त्यापैकी काही पाणी हे तापी नदीला जाऊन मिळाले. हे वाया जाणारे पाणी डाव्या कालव्याच्या माध्यमातून रामी परिसराला दिल्यास या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात टेक्नीकल माहिती घेऊन धुळे जिल्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब, जिल्हाधिकारी श्री.यादव साहेब यांच्या समोर मांडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु, असेही श्री.साळुंके यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या समवेत उपजिल्हा संघटक कल्याण बागल, नितीन माळी, उपतालुकाप्रमुख राजु कोळी, ॲड.ज्ञानेश्वर पाटील, नारायण पाटील, ईश्वर गिरासे, माजी सैनिक अनिल बागल, ईश्वर पाटील, रामसिंग सूर्यवंशी, सुनिल पाटील, नरेंद्र गिरासे, योगेश पाटील, प्रशांत गिरासे, दोंडाईचा शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, गोकूळ माळी, नितीन महाजन, अर्जून माळी, हिलाल माळी, रणजीत राजपूत, प्रशांत राजपूत, सुभाष माळी, विराज राजपूत यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news
