धुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख नागरिकांची आरोग्य तपासणी : डॉ. शिवचंद्र सांगळे ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत 702 पथके करताहेत तपासणी



माझे कुटुंब- माझी जबाबदारीमोहिमेत 702 पथके करताहेत तपासणी

 

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्यामाझे कुटुंब- माझी जबाबदारीमोहिमेत आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील चार लाख 7 हजार 775 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतून 135 नागरिकांना पुढील आरोग्य सेवेसाठी संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनानेमाझे कुटुंब- माझी जबाबदारीही मोहीम 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेस धुळे जिल्ह्यात सुरवात झाली आहे. आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 702 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके धुळे जिल्ह्यातील 668 गावांतील तीन लाख 41 हजार 91 घरांना भेट देवून 16 लाख 85 हजार 89 नागरिकांची 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत तपासणी करतील. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेट देणार आहेत. या घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे कोविड 19 ची प्रयोगशाळा चाचणी करून पुढील उपचार केले जाणार आहेत.

 कोमॉर्बिड असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात किंवा नाही याची खात्री करण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे औषधोपचारासाठी नागरिकांना संदर्भित करण्यात येणार आहे. प्रत्येक पाच ते दहा पथकांमागे एक वैद्यकीय अधिकारी उपचार संदर्भ सेवा देतील. याशिवाय घरातील सर्व सदस्यांना प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारीही मोहीम 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहील. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण होईल. दुसरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होईल. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा आहे.

धुळे जिल्ह्यातील आरोग्य पथकांनी आतापर्यंत 1 लाख 18 हजार 690 घरांना भेट देवून चार लाख 7 हजार 775 नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. या तपासणीत कर्करोगाचे 145, मधुमेहाचे दोन हजार 461, खोकल्याचे 418, तापाचे 353, श्वास घेण्यास त्रास असलेले 38, घसा दुखीचे 28, तर अन्य आजारांचे एक हजार 24 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 135 रुग्णांना पुढील औषधोपचारासाठी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. या तपासणीत ताप किंवा ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांना जवळच्य फिव्हर क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे, अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी. मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान मोजावे तापमान 98.7 फॅरनाहाइट (37 अंश सेल्सिअस) पेक्षा जास्त आढळल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणी करून घ्यावी.

सध्या सुरू असलेल्या आजारांवरील उपचार सुरू ठेवावेत. त्यात खंड पडू देवू नका, डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घ्यावी. कोविडमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी ताप, खोकला, दम लागणे आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरित फिव्हर क्लिनिक किंवा कोविड चाचणी केंद्रात जावून तपासणी करून घेत डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार करून घ्यावेत. घरच्या घरी औषधोपचार करू नयेत. कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती गृह अलगीकरण अंतर्गत घरी असेल किंवा रुग्णालयातून दहा दिवसानंतर सात दिवसांच्या गृह अलगीकरणमध्ये घरी असेल, तर अशा व्यक्तींनी सतत मास्क लावावा, खोलीच्या बाहेर पडू नये, दर दोन तासांनी हात स्वच्छ धुवावेत. स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमचा वापर करावा. कपडे, भांडी स्वतंत्रपणे वापरावीत. ताप आल्यास किंवा थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल व्हावे, असेही आवाहन डॉ. सांगळे यांनी केले आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने