धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोना (COVID 19) बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ आदींची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यान्वये जिल्हाधिकारी श्री. यादव यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. यादरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच याबाबत मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व जनहितार्थ निर्णयांची प्रभावी, काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी भरारी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
भरारी पथक असे : धुळे उपविभाग (महानगरपालिका क्षेत्र वगळून)- उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये सहाय्यक जिल्हा कोशागार अधिकारी, धुळे, उपकोशागार अधिकारी, साक्री, नायब तहसीलदार (महसूल), धुळे ग्रामीण, नायब तहसीलदार, साक्री, तालुका आरोग्य अधिकारी, साक्री, तर सदस्य सचिव म्हणून साक्री ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी काम पाहतील.
शिरपूर उपविभाग : उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये उपकोशागार अधिकारी, शिरपूर व शिंदखेडा, नायब तहसीलदार (महसूल) शिरपूर व शिंदखेडा, निवासी नायब तहसीलदार, दोंडाईचा, तालुका आरोग्य अधिकारी, शिरपूर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, शिरपूर यांचा समावेश असेल, तर दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हे सदस्य सचिव असतील. भरारी पथकप्रमुखांना आवश्यकता वाटली, तर त्यांच्यास्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेणार आहेत.
भरारी पथकांची कार्यवाही पुढील प्रमाणे राहील : भरारी पथकांनी तालुक्यातील कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना अचानक भेट देवून राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. खासगी रुग्णालयांनी नमूद अधिसूचना आणि अधिसूचित दर दर्शनी भागावर रुग्णांना आणि नातेवाईकांना दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे लावले आहेत किंवा नाही याची तपासणी करावी. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम करण्यापूर्वी या देयकांची तपासणी करावी. ही देयके विहित दरापेक्षा जास्त आकारण्यात येतात किंवा कसे याची तपासणी करावी. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व खासगी रुग्णालये दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देतात किंवा याचीही तपासणी करावी. भरारी पथकातील सर्व सदस्यांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडावी. जबाबदारी पार न पाडल्यास साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
news