धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन शनिवार 15 ऑगस्ट 2020 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगत नेमून दिलेली जबाबदारी समन्वयातून चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पोलिस दलाने पुरेशी सुरक्षा व्यवस्था तसेच शहरातही सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवावी. या समारंभाची रंगीत तालिम पोलिस दलाने एक दिवस आधी घ्यावी. या कार्यक्रमात कोरोना योद्धा (डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासह कोरोना विषाणूवर विजय मिळविलेले नागरिक) यांना महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निमंत्रित करावे. तसेच महानगरपालिकेने शहरातील सर्व भागांची स्वच्छता ठेवावी. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यालयांनीही आपापले कार्यालय व परिसरात स्वच्छता ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील बगीचाचे सुशोभिकरण करुन परिसर सुस्थितीत ठेवावा. तसेच आवश्यक तेथे रंगरंगोटी करावी. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. वनविभागाने ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा.
शिक्षण विभागाने आंतरशालेय, आंतर महाविद्यालयीन वादविवाद, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध, व काव्य स्पर्धांचे ऑनलाइन पध्दतीने आयोजन करावे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच राज्य शासनाचा गृह विभाग, आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
Tags
news
