दूध भेसळ प्रतिबंधासाठी संयुक्त पथकाची स्थापना जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश




धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात दूध भेसळीस आळा घालण्याकरीता जिल्हास्तरावर संयुक्त पथक गठित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पथक गठित करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशास विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. 
दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग व दुग्ध व्यवसाय विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या संयुक्त पथकामध्ये समावेश राहील. या पथकात सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशास विभाग व जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी, दुग्ध विकास विभाग हे संयुक्तपणे पथकप्रमुख असतील. याशिवाय अन्न सुरक्षा अधिकारी, दुग्ध रसायनशास्त्रज्ञ/दुग्ध शाळा पर्यवेक्षक हे सदस्य असतील, तर दूध संकलन पर्यवेक्षक/वर्ग- 4 कर्मचारी (दुग्ध व्यवसाय विकास विभाग) हे सहाय्यक असतील. 
या पथकामार्फत धुळे जिल्ह्यात दूध भेसळीबाबत तपासण्या करण्यात येणार आहेत. ही पथके दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडे दूधात भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर या तक्रारींची माहिती संकलित करून पथकप्रमुखांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर या पथकप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येईल. या पथकास दूध भेसळ होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर अशा दूध संकलन केंद्र, शीतकरण केंद्र, पाऊचिंग केंद्र, जकात नाका, टोलनाका, सीमाभाग, झोपडपट्टी आदी ठिकाणी सुद्धा दूध तपासणी करून नमुने घेण्याबाबत समन्वयाने कारवाई सदरील पथक करेल. याशिवाय अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पध्दतीनुसार आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्रपणे कारवाई करण्याचे काम सुरू ठेवावे. दुधातील भेसळीची तपासणी करताना या पथकास आवश्यकता भासल्यास पोलिस दलाची मदत घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले आहेत.  

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने