कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई! : जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूबाबत आढावा बैठक संपन्न

 


धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) :, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. अलिकडे मृत्यूंची संख्याही वाढली आहे. ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही या आदेशांवर कार्यवाही करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्या पुढे पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर  आढावा घेण्यासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, सुरेखा चव्हाण, श्रीकुमार चिंचकर हे नोडल अधिकारी, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे,  महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने उपलब्ध मनुष्यबळाचे परिपूर्ण नियोजन करावे. जिल्हा रुग्णालयासह शिरपूर, दोंडाईचा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त बेड दोन ते तीन दिवसांत तयार करून त्याचा अहवाल सादर करावा. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये निर्देश देवूनही अद्याप कार्यवाही करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे प्रस्ताव सात दिवसांत सादर करावेत. त्यासाठी अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.

कोरोना विषाणूमुळे मृत्यूदर वाढत आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. आवश्यक तेथे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घ्यावी. तसेच क्षेत्रस्तरावरील कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करावे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही कन्टेन्मेन्ट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने समित्या गठित कराव्यात. या समित्यांच्या माध्यमातून कन्टेन्मेन्ट झोनची परिणामाकारक अंमलबजावणी करावी. धुळे शहरातील अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये तातडीने रुग्ण दाखल करण्यास सुरवात करावी. पोलिस विभागाने विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अधिष्ठाता डॉ. सापळे, अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. शिंदे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचारांची माहिती दिली.

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने