धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी आणि शेतमजूर हे शेतीशी निगडित सर्वांत महत्वाचे घटक आहेत. त्यांना कीटकनाशके फवारणीचे शास्त्रीय ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. तो प्रत्येक तालुकास्तरावर होईल. या प्रशिक्षणातून शेतकरी आणि शेतमजूरांना फवारणी तंत्रज्ञानाची शास्त्रीय माहिती मिळून त्याचा शेती विकासासाठी लाभ होईल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे पिंप्री, ता. जि. धुळे येथील कृषी चिकित्सालयात आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय शेतकरी, शेतमजूर प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विलासराव सोनवणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. नांद्रे, शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे म्हणाले, की सध्या खरीप हंगामाचे दिवस सुरू आहेत. पिकांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पिकांचा किडीपासून बचाव व्हावा म्हणून शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र, फवारणीवेळी पुरेशी काळजी घेतली नाही, तर विषबाधेसारख्या दुर्दैवी घटना घडतात. त्यातून एखाद्या वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकार होवू नयेत, शेतकरी, शेतमजुरांचे विषबाधेपासून संरक्षण व्हावे, त्यांनी फवारणीवेळी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी शेतकरी/शेतमजुरांच्या प्रशिक्षणाची संकल्पना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मांडली होती. त्याचाच एक भाग म्हणून आजचा प्रशिक्षण वर्ग होत असून धुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील.
शेतकरी आणि शेतमजुरांनी या प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा उपयोग कीटकनाशकांच्या फवारणी वेळी करावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी यावेळी केले. शास्त्रज्ञ डॉ. पाटील, डॉ. नांद्रे यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. उपसंचालक श्री. मालपुरे यांनी प्रास्ताविक केले. मंडळ कृषी अधिकारी रमेश पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी शेती सुधार साहित्य केंद्राचे प्रसाद पाटणकर यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी शेतकरी, शेतमजूर, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
Tags
news


