धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, युध्द विधवा, विधवा, पत्नी यांच्या पाल्यांना 10 व 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी 20 सप्टेंबर 2020 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
श्री. गायकवाड यांनी म्हटले आहे, कल्याणकारी निधी सुधारित नियमान्वये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कारप्राप्त खेळाडू, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्का रविजेते, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची पूर, जळित, दरोडा, अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये कामगिरी करणारे तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे, तसेच IIT, IIM, AIIMS अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना तसेच 2019- 2020 मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणारे (महाराष्ट्र राज्यातून दहावी व बारावीत गुणानुक्रमे उत्तीर्ण होणाऱ्या 50 पाल्यांना 10 हजार रुपयांचा हा पुरस्कार देण्यात येईल.)
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेवून विद्यापीठामध्ये सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, माजी सैनिक, पत्नी पाल्यांना त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीयस्तरासाठी 10 हजार रुपयांचा, आंतरराष्ट्रीयस्तरासाठी 25 हजारांचा पुरस्कार, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्दविधवा यांच्या पात्र पाल्यांनी 20 सप्टेंबर 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. गायकवाड यांनी केले आहे.
....................................................
माजी सैनिक पाल्यांना आवाहन
धुळे, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकी एक माजी सैनिकांच्या, विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पाच हजार रुपये या पुरस्काराची रक्कम आहे. या पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 20 सप्टेंबर 2020 पर्यंत पात्र पाल्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यासाठी माजी सैनिक, विधवांचे हस्तलिखित अर्ज, डी. डी. 40 अर्ज, विधवांचे ओळखपत्र, दहावी, बारावीतील प्रमाणपत्र, गुणपत्रकाची छायांकित प्रत सोबत जोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.