आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य ,सार्वभौमिकता आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी बलाढ्य मुगल सत्तेशी सतत २५ वर्ष कडवी झुंज देऊन अजेय ठरलेले वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहांच्या गौरवशाली इतिहासाचे चित्रण करणारा ''राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह --एक अपराजित योद्धा'' या हिंदी भाषेतील ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झालेले आहे. सुप्रसिद्ध वक्ते, लेखक तसेच महाराणा प्रतापांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री जयपालसिंह गिरासे यांनी सदर ग्रंथ लिहिलेला असून चेन्नई -सिंगापूर-मलेशिया येथील नोशन प्रेस पब्लिशिंग मार्फत सदर ग्रंथाचे प्रकाशन केले गेलेले आहे . एकूण ३३६ पृष्ठांच्या या ग्रंथात महाराणा प्रतापसिंहांच्या जन्मापासून मृत्यपर्यंतच्या रोमहर्षक इतिहासाचे तपशीलवार वर्णन आहे. उदयपूर येथील सुप्रसिद्ध विचारवंत श्री प्रतापसिंह झाला यांनी सदर ग्रंथासाठी विस्तृत प्रस्तावना लिहिलेली आहे. ग्रंथाच्या शेवटी स्वतंत्र चार परिशिष्टांच्या माध्यमातून महाराणा प्रतापसिंह यांच्याशी संबंधित विविध व्यक्तिरेखांची माहिती दिलेली आहे . सदर ग्रंथात आजपर्यंत प्रचलित असलेल्या अनेक तिथी-तारखांची-तसेच विविध घटनांच्या क्रमांची सुधारित व अद्यावत संशोधनांतून निष्पन्न झालेल्या माहितीचा समावेश आहे. लेखक श्री जयपालसिंह गिरासे यांचे प्रकशित होणारे हे दुसरे पुस्तक असून येत्या काळात अजून ३ ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत . श्री गिरासे यांनी प्रत्यक्ष दहा वर्षे या विषयावर अभ्यास-संशोधन केलेले असून मेवाड राजपरिवार, विविध सरदार -सामंत-ठिकाणेदार यांच्या परिवारातील सदस्यांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेऊन विविध ऐतिहासिक माहितीची पुष्टी त्यांनी केलेली आहे . मेवाड च्या इतिहासावर आधारित विभिन्न प्राचीन ख्यात, प्रशस्ति , ऐतिहासिक ग्रंथ, समकालीन लोकसाहित्य, शिलालेख , ताम्रपट , ऐतिहासिक वास्तू , विभिन्न ऐतिहासिक साधने , मुगल कालीन लेखकांनी लिहिलेले विभिन्न ग्रंथ, अर्वाचीन संशोधने आदींचा तपशीलवार अभ्यास त्यांनी केलेला आहे .
एकंदरीत लेखक श्री जयपालसिंह गिरासे यांनी या ग्रंथाच्या निर्मितीसाठी अनंत परिश्रम घेतलेले असून सदर ग्रंथ महाराणा प्रतापसिंहांच्या इतिहासावर अभ्यास करणाऱ्या संशोधक व इतिहासाचे अभ्यासकांसाठी एक महत्वाचा ग्रंथ ठरेल. सदर ग्रंथ हा प्रिंट बुक, किंडल ई -बुक, आय-बुक इ स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध झालेला असून अमेझान , फ्लिपकार्ट, स्नॅपडील, नोशन प्रेस सारख्या अनेक ई -कॉमर्स वेबसाईटस वर उपलब्ध आहे.
Tags
news
