काल धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार बैठकीसाठी आले होते. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनांनी लोकशाही मार्गाने निवेदन देण्यासाठी वेळेची मागणी केली होती. मात्र त्यांना ही भेट नाकारण्यात आली विद्यार्थी संघटनांनी आपल्या रास्त मागण्या मंत्रीमहोदयांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची गाडी थांबवून त्यांना आपले निवेदन देण्याच्या प्रयत्न केला असता बंदोबस्तावर असलेल्या धुळे पोलिसांच्या क्यू आर टी पथकाने अमानवीय पद्धतीने या प्रकाराला हाताळले आणि त्यातून एक फार मोठा वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन पोलिसांच्या जिव्हारी लागले विद्यार्थी आंदोलन करणार आहेत ही बाब गोपनीय शाखेच्या निदर्शनास आली नाही आणि त्यामुळे ऐन वेळेस झालेल्या या आंदोलनाला दडपशाही मार्गाने दडपून टाकण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला गेला आणि एखाद्या सराईत गुन्हेगारा सोबत वागावे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना लाठ्या, काट्यांनी आणि हाता बुक्यांनी ठोसे मारून घायाळ केले .जणूकाही पोलिसांच्या अंगात राक्षस संचारला होता .झालेली ही घटना अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आपल्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने यापूर्वी देखील आंदोलने होत आली आहेत. मात्र या आंदोलनाला हाताळण्याची पोलिसांची पद्धत काल दिवसभर चर्चेचा विषय होती. हा सर्व प्रकार प्रसार माध्यमांच्या समोर घडत असेल आणि पोलिस आपल्या बाळाच्या वापर विद्यार्थी आणि नागरिकांवर करत असतील तर मग सामान्य माणसाचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे? पोलिसांना आपल्या बाळाच्या वापर करायचं असेल तर त्याने तो अवैध व्यवसाय आणि गाव गुंडांच्या विरोधात करावा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बेदम व अमानुष मारहाण करणे अत्यंत चुकीचे असून संपूर्ण प्रकाराबद्दल राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या मारहाणीच्या विरोधात आज दिवसभरात विविध संघटना व राजकीय पक्ष यांनी निवेदन दिली आहेत. विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाण प्रकरणात दोषीवर कारवाई करावी अशी देखील मागणी पुढे येत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याच्या आदेश कोणी दिला ? याबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस जनतेचे रक्षक आहेत की भक्षक आणि असे असेल तर मग भविष्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करावे की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होऊन दोषी पोलीस अधिकार्यांवर कारवाई झालीच पाहिजे यासाठी विविध विद्यार्थी संघटना आग्रही असून पालक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्याभरात विविध संघटनांनी निवेदन दिले आहेत व मारहाण करणारे पोलीस कॅमेरात कैद झाले आहेत त्यांना निलंबित करण्याची मागणी पुढे येत आहे. या बाबत मात्र कठोर कारवाई न झाल्यास राज्यात हा प्रश्न पेट घेऊ शकतो व विद्यार्थी संघटना आक्रमक होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Tags
news
