शिरपूर (प्रतिनिधी) : अनेक दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कापूस, मुग, चवळी, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांची शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. संबंधितांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन पिकविम्याची मदत मिळवून देऊ, असे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साळुंके यांनी दिले. यासंदर्भात कृषीमंत्री ना.भुसे, पालकमंत्री ना.सत्तार यांनाही नुकसानीची कल्पना दिली असून शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करण्यात येईल असे ते म्हणाले.
या पाहणी दौऱ्यांत त्यांनी शिरपूर तालुक्यातील वरझरी, हिंगोणीपाडा या गावांना भेट देवून या ठिकाणी मुग, कपाशी, चवळी पिकांची पाहणी केली. शिरपूर तालुक्यातील हि गावे आदिवासी पट्टात असून डोंगरदऱ्यातील चढ-उतारावर शेती केली जाते. नुकसानीची पाहणी करतांना आदिवासी, शेतकऱ्यांनी काही मदत न मिळाल्यास विष पिऊन मरण्याची वेळ येईल असे दु:ख व्यक्त केले. शेतकऱ्यांनी खचून न जाता सरकारवर विश्वास ठेवावा. नुकसानीची लवकरच भरपाई मिळवून देऊ असेही शेतकऱ्यांना धीर देतांना साळुंके म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, तालुकाप्रमुख भरतसिंह राजपूत, मुकेश शेवाळे, अत्तरसिंग पावरा गणेश परदेशी, प्रदीप पवार, सुकदेव बागुल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
