शिरपूर- शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना अनेक पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी तसेच हजारो फळ पीक विमा धारकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के. डी. पाटील पाठपुरावा करत आहेत.
पीकविमा नुकसान भरपाई साठी नेहमीच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी फार मोठ्या प्रमाणात सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी सांगितले.
तसेच शेतकरी बांधव यांना पिकविमा बाबत माजी जि. प. उपाध्यक्ष के. डी. पाटील यांच्यासह शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह जमादार, प्रकाश भोमा पाटील, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, पिळोदा येथील माजी सरपंच योगेश पाटील, जितू सुर्यवंशी यांचे चांगले सहकार्य लाभत आहे.
आतापर्यंत हजारो हेक्टर क्षेत्रातील नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिरपूर तालुक्यातील फळ पिक विमाधारक शेतकरी बांधवांना तालुक्यातील सात सर्कल मधील "सदोष शासकीय रडार यंत्रणा" अडथळा ठरत आहे. लवकरात लवकर शासनाने व विमा कंपनीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा नुकसान भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात जाणार असा हजारो शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.
शासनाची रडार यंत्रणा सदोष असून कुचकामी ठरत आहे, यामुळे असंख्य शेतकरी बांधवांना आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. हक्काचे घेणे असतांना तो मिळणार नसल्याने न्यायालयात जाण्याचा इशारा असंख्य शेतकरी यांनी दिला आहे
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत ज्यांनी फळपिक विमा काढला आहे अशा हजारो शेतकरी बांधवांना कोणताही आर्थिक लाभ मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. कारण, या फळपिक विम्यासाठी शिरपूर तालुक्यातील सात सर्कल मध्ये असलेल्या रडार वरील रिडींग (नोंदी) ग्राह्य धरले जातात. या शासकीय रडार यंत्रणेवर दि. 17 मार्च व कालावधीत वाऱ्याचा वेग फक्त 18 किमी प्रति तास तसेच शून्य प्रमाणात पाण्याची नोंद झाली आहे. परंतु, शेतकरी बांधवांना फळपिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी वाऱ्याचा वेग किमान 40 किमी प्रति तास असणे अत्यावश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच, आंबा, केळी, पपई, लिंबू, डाळींब वगैरे अनेक पिकांसाठी भरमसाठ विमाहप्ते भरून सुद्धा शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त सदोष रडार यंत्रणेचा फटका बसला आहे.
कारण, गेल्या दोन महिन्यांपूर्वी दि. 17 मार्च रोजी म्हणजे त्याच दिवशी अवकाळी पाऊस, गारपिटीने तसेच वादळी वाऱ्याने शिरपूर शहरासह तालुक्यात हाहाकार माजवला. यात कोट्यावधीचे नुकसान झाले. असंख्य महाकाय वृक्षे उन्मळून पडली होती. विजेच्या तारा तुटून पडल्या. अनेक घरांचे पत्रे उडाले. अनेक दिवस विज बंद होती. 80 ते 100 किमी प्रति तास वेगाने वाऱ्याचा वेग व मुसळधार पावसामुळे, गारपिटीने फार नुकसान झाले. जनावरे व दोन जण दगावले. या सर्व नुकसानभरपाई बाबत जिल्हाधिकारी, सीईओ व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी संयुक्त स्वाक्षरीने शिरपूर तालुक्यात फळपिक व रब्बी पिके मका, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मूग, तूर, सूर्यफूल, भुईमूग, कांदा, ऊस, टमाटे, टरबूज, भाजीपाला, केळी, पपई, लिंबू आदी अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याबाबत सरसकट पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविला.
एवढ्या शासकीय नोंदी असतांना देखील रडार यंत्रणेत वाऱ्याचा वेग 18 किमी प्रति तास व शून्य पाणी पडणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मारक अशी निकृष्ट दर्जाची यंत्रणा आहे.
या सर्व बाबतीत शासनाने व विमा कंपनीने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून सर्व शेतकरी बांधवांना न्याय देऊन त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचा हक्काचा पिक विमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, अन्यथा हजारो शेतकरी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
