शिरपूर . मागील दोन महिन्यांपासून राज्यासह धुळे जिल्हा कोरोनाच्या संकटात सापडला आहे. धुळे जिल्ह्याने कोरोना रुग्णांची शंभरी पार केली असून दिवसेंदिवस करून कोरोना मीटर वाढत चालले आहे. सध्याच्या काळात आरोग्य सेवेकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे आरोग्य विभागाची भूमिका या काळात सर्वाधिक महत्त्वाची असून आरोग्य विभाग देखील दिवस-रात्र एक करून कोरोनाच्या लढ्यामध्ये प्रथम योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे आजच्या काळात डॉक्टर हाच देव अशीच संकल्पना रूढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कर्तव्यात वाढ झाली असून त्यांनादेखील काटेकोरपणे कामकाज करण्याची गरज आहे. एका बाजूला आरोग्य विभाग चांगली आरोग्य सेवा देण्याच्या प्रयत्न करून प्रभावीपणे कोरोना रुग्णांवर उपचार करून त्यांना रोगमुक्त करत आहे. मात्र हे करत असताना काही मानवी चुकांमुळे आरोग्य विभागाकडून अक्षम्य चुका देखील होत आहे याचे भान राखून भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची दखल घेणे देखील गरजेचे आहे. मागील काळात आरोग्य विभागाच्या देखील गलथान कारभार समोर आला आहे. यात प्रामुख्याने मागील काळात मयत रुग्णची डेथ बॉडी अदला बदल होण्याचा धक्का दायक वृत्त समोर आले होते,
यानंतर अर्थे येथील वृद्ध दाम्पत्यास सोबत देखील असाच प्रकार घडला होता आणि कोणतेही तपासणी विना त्यांनी घरच्या रस्त्याला धरल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते यानंतर हेच वृद्ध दांपत्य कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
आता पुन्हा शिरपूर तालुक्यातून भाटपुरा गावातील कोरोना रुग्णाच्या पत्नी बाबत विभागाकडून अक्षम्य चूक झाल्याचे समोर आले आहे. सदर महिलेला तिच्या पतीसोबत कोणत्याही प्राथमिक सुरक्षा विना पाठवण्यात आले होते सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून सदर महिलेची प्राथमिक तपासणी करून नमुने घेणे गरजेचे असताना या महिलेला कोणत्याही सुविधा प्राप्त झाल्या नाही अथवा खाण्या-पिण्याची देखील सोय झाली नाही म्हणून तीने सरळ दवाखान्यातून घरची वाट धरत 70 किलोमीटरचा पायी प्रवास करत आपले गाव गाठले. घटना समोर आल्यानंतर प्रशासन पुन्हा कामात लागले सदर महिलेला पुन्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र वारंवार आरोग्य विभागाकडून अशा गंभीर प्रकारच्या चुका का होत आहेत याचा शोध घेऊन घेऊन दोषींवर कार्यवाही होण्याची गरज आहे. आणि भविष्यात अशा चुकामुळे मानवी जीवन धोक्यात येणार नाही याचीदेखील दक्षता आरोग्य विभागाने घेणे गरजेचे आहे. चांगले काम करत असलेल्या आरोग्य विभागाला अशा काही चुकांमुळे टीकेचा धनी देखील व्हावे लागत आहे. त्यामुळे येत्या काळात आरोग्य विभागाचा वाढता ताण लक्षात घेता त्यांना आवश्यक असलेल्या सेवा सुविधांसाठी, उपकरणे मनुष्यबळ आणि इतर बाबींची पूर्तता करून आरोग्य विभागाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. एकी कडे लॉकडाऊन चे पालन करून लोक आपली सुरक्षा करत असताना अश्या चुकांमुळे कोरोना अधिक वेगाने पाय पसरु शकतो याची जाणीव ठेवून कामकाज होणे गरजेचे आहे. यामूळे किमान कोरोना काळात अश्या चुका होऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
