शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे पाणीपट्टी बिल मध्ये 12 ते 15 टक्के कपात जाहीर



शिरपूर - कोविड - 19 आजारामुळे अतिशय अडचणीच्या काळात लोक जीवन जगत आहेत. सद्य परिस्थितीत अनेक नागरिक बेरोजगार असून त्यांच्या हाताला काम नाही. सर्व व्यवसाय, व्यवहार ठप्प झाल्याने सर्वच जनता अडचणींचा सामना करत आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार करता पाणीपट्टी बिल मध्ये 12 ते 15 टक्के कपात करण्याचा निर्णय शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या दि. 14 मे रोजी झालेल्या स्थायी मिटींग मध्ये जाहीर करण्यात आला.

स्थायी मिटींग मध्ये सुधारित सवलतीचे पाणी पट्टी चे दर जाहीर करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. यानुसार दि. 1 जानेवारी 2020 पासून पाणीपट्टी दरात सवलत देण्याचा विषय सर्वानुमते पारित करण्यात आला.  प्रति महिना 0 ते 18,000 लिटर पर्यंत पाणी वापर करणाऱ्या नागरिकांना आता कमीत कमी 1332 रुपये वार्षिक पाणीपट्टी भरावी लागेल. यासाठी पूर्वी किमान 1548 रुपये भरावे लागत होते. त्यानंतर पाण्याचा जास्त वापर करणाऱ्या नागरिकांना पूर्वीच्या दरात 12 ते 15 टक्के कपात करून पाणीपट्टी बिल भरावे लागेल. महत्वाची बाब म्हणजे, दि. 31 डिसेंबर 2019 पूर्वीच्या देयकांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच थकबाकीदार नागरिकांनी थकबाकी भरल्याशिवाय त्यांना सुधारित दराचा लाभ मिळणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे.

तसेच सर्वच नळ कनेक्शन धारकांनी एक महिन्याच्या आत आपल्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीला बॉल व्हॉल्व बसवून घ्यावे. नाहीतर शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या 50 टक्के खर्चाने बॉल व्हॉल्व बसवून देण्यात येणार असून उर्वरित 50 टक्के रक्कम नागरिकांकडून टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येणार आहे. बॉल व्हॉल्व्ह बसवल्यामुळे

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची मिटींग नगरपरिषदेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी 9:30 वाजता घेण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, बांधकाम सभापती तपनभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, पाणीपुरवठा सभापती गणेश सावळे, शिक्षण सभापती सौ. चंद्रकला माळी, आरोग्य सभापती चंद्रकांत सोनवणे, स्थायी समिती सदस्य राजेंद्र गिरासे, मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नगर अभियंता माधवराव पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात इतरत्र अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असतांना माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी दूरदृष्टीने केलेल्या पाण्याच्या नियोजनपूर्वक कामातून शिरपूरला आजपर्यंत कधीही पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. शिरपूरच्या नागरिकांना आजपर्यंत कधीही पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. शिरपूर शहरात भर उन्हाळ्यात नियमितपणे सकाळी 3 तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. करवंद जॅकवेल येथून पाणी पुरवठा बंद असतांना देखील शहरात नियमित पाणी पुरवठा केला जात आहे. अतिशय चोखपणे नगर परिषदे मार्फत पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे असेही नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने