बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी भागात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा कार्यकर्त्यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे यांनी ठरवले होते.त्यानुसार आज सरपंच सुरेखाबाई पावरा यांच्या हस्ते ४१ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोखीने देण्यात आले.
आदिवासी भागातील गांव-पाडयावर विविध समस्याना सामोरे जावून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर याची महत्वाची भूमिका बजावली आहे. दिवस-रात्र काम करून बाहेर गावाहुन आलेल्या लोकांची नोंदणी, गावात कोणी आजारी पडले आहे का. अशा विविध प्रकारच्या नोंद करून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे. काही वेळेतर रात्री-बेरात्री बाहेर गावाहून कोणी व्यक्ती दाखल झाल्याची बातमी कळताच प्रत्येक कर्मचारी आप-आपल्या परीने नोंदणी करून नवीन आलेल्या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाऊन त्या व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करुन घेण्याचे चांगले काम केले आहे. तसेच अंगणवाडी केंद्राच्या वतीन गरम ताजा आहाराच्या आयोजी ३ ते ६ वयोगटातील लहान बालकांना कच्चा आहार, डॉ. ए.पी.जे. अंब्दुल कलाम अमृत आहार योजना अंतर्गत शिजलेल्या आहारा ऐवजी कच्चे धान्य वाटप करून महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
बोराडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा पावरा यांच्या हस्ते ४१ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण ४१ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता बुधवारी अदा करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत याकामी आघाडी घेतली.कोरोना विषाणू संसर्गाविषयी गावपातळीवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबवणे,आरोग्याची काळजी घेणे,गावातील प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षण करणे,गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती घेणे अशा स्वरुपाची कामे ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,आशा कार्यकर्त्या जिवाची पर्वा न करता करीत आहेत.
उपसरपंच राहुल रंधे,ग्रामविकास अधिकारी तमखाने यांनी तात्काळ निर्णय घेऊन ४१ कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता १४ व्या वित्त आयोगातून कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यात आला. हया प्रसंगी सदस्य संजय पाटील, जिजाबराव पाटील, सुकदेव भिल, अर्जुन भिल,विजय सत्तेसा, डोंगरसिंग पावरा, पंतसंस्थेचे चेअरमन शंशाक रंधे आदी उपस्थित होते. प्रोत्साहन भत्ता वाटपा प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या सोशल डिस्टनसिंग चे पालन करून रोखीने देण्यात आला.सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.अश्याच प्रकारचे सेवेचे कार्य निरंतर स्वरूपात सुरू ठेवा व गावाची तसेच स्वतःची निगा राखा असे सांगून कोरोना विरोधातल्या लढ्यात सर्व कर्मचारी नियमित कार्य करीत आहेत त्या बद्दल भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तसेच बोराडी गावचे उपसरपंच राहुल रंधे यांनी कौतुक केले.
