‘कोरोना’ विषाणूची अफवा, खोटी माहिती प्रसारित केल्यास गुन्हा दाखल करणार : पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित



धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ‘कोरोना’ विषाणूसंदर्भात अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित करणे कायद्यान्वये गुन्हा असून अशा व्यक्तींवर पोलिस प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ विषाणूविषयी कुणीही अफवा व खोटी माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी म्हटले आहे, आंतरराष्ट्रीयस्तरासह भारतात व महाराष्ट्र राज्यातही ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेले बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असले तरी नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी वैयक्तिकस्तरावर तसेच सार्वजनिक पातळीवर योग्य ती दक्षता घ्यावी. तसे केल्यास ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध घालता येईल. तसेच नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. वेळोवेळी सॅनिटायझर, साबण किंवा हॅण्डवॉशने हात स्वच्छ धुवावेत. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरावा. अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अनावश्यक प्रवास टाळावा. जिल्हा प्रशासनातर्फे यापूर्वीच सार्वजनिक कार्यक्रम, सभा, यात्रा, सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. या बंदीचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता असल्याने सामूहिक प्रार्थना, धार्मिक विधी, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती शक्यतो टाळावी. अत्यावश्यक असल्याशिवाय कुठलेही शासकीय/खासगी कार्यालय, धार्मिकस्थळ, व्यापारी आस्थापना, बाजारपेठ व इतर गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
‘कोरोना’ विषाणू सदृश लक्षणे दिसल्यास जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. विदेशातून आपल्या परिसरात आलेल्या नागरिकांची माहिती जिल्हा प्रशासनाला तत्काळ द्यावी. कुणीही व्यक्ती सोशल मीडियावर ‘कोरोना’ विषाणू संदर्भात अफवा किंवा खोटी माहिती प्रसारीत करणे कायद्याने गुन्हा असून अशा व्यक्तीवर पोलिस प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कुणीही अफवा व खोटी माहिती पसरवू नये, असेही आवाहन पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने