‘करोना’ : नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी बाळगावी धुळे जिल्हा प्रशासनाचे आवाहन, धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू



धुळे, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी ‘करोना’ या आजाराला घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांपासून दूर राहावे. जिल्हास्तरावर धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 6 खाटा (बेड), चार व्हेंटिलेटर व वैद्यकीय तज्ज्ञांसह सुसज्ज अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रशासकीय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी शंका निरसनासाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
चीनमध्ये करोना विषाणू आजाराचा उद्रेक सुरू झाला आहे. चीन व्यतिरिक्त अन्य 118 देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचा प्रवेश भारतात होवू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग तसेच या प्रवाशांना 14 दिवसांकरीता पाठपुरावा, लक्षणे आढळलेल्या प्रवाशांचे विलगीकरण आणि प्रयोग शाळा तपासणी आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.
सद्य:स्थिततीत जगात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 118374 करोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 4295 मृत्यूमुखी पडले आहेत. करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच या विषाणूचे गांभीर्य पाहता शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत गर्दी होईल, असे शासकीय, खासगी आदी सर्व कार्यक्रमांचे आयोजन न करणे, जिल्ह्यातील सर्व स्वीमिंग पूल न वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
‘करोना’ विषाणू आजाराची प्रमुख लक्षणे
       ‘करोना’ विषाणूची लक्षणे हे श्वसन संस्थेशी निगडित असून त्यामध्ये सर्दी,खोकला, श्वास घेण्यासाठी  त्रास, न्यूमोनिया, ताप आदी आहेत. करोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने बाधित रुग्णाच्या खोकणे, शिंकण्याव्दारे बाहेर पडणाऱ्या दूषीत अतिसूक्ष्म  थेंबाव्दारे, त्याचप्रमाणे  दूषीत जागांच्या संपर्काव्दारे, हस्तांदोलन आदी कारणांमुळे होतो. धुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत या साथीचे रुग्ण आढळून येत नसले, तरी भविष्यात सर्तकता म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे या आजारासाठी 6 बेड, 4 व्हेंटिलेटर   तज्ञ डॉक्टरासह सुसज्ज अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
करोना प्रतिबंध  नियंत्रण संदर्भातील उपाययोजना :-
या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, फुफ्फुसाचे आजार असलेल्या व्यक्ती, तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्ती, गर्भवती माता, बालके, मधुमेह, कर्करोग व किडनीचे आजार आदी लोकांनी विशेष काळजी घ्यावी. सर्व नागरिकांनी वेळोवेळी  जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकलताना नाक  तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा- नाक  डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमामुळे (उदा.यात्रा-जत्रा,मेळावे, परिषदांसारखे गर्दीचे कार्यक्रम शाळा, महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, प्रदर्शने  इतर धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे सार्वजनिक उत्सव ‘करोना’ विषाणूच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांनी  गर्दीच्या ठिकाणावरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन  करण्याबाबतचे महत्व पटवून देत संबंधित आयोजकांस कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून परावृत्त करावे.
महत्वाचे
Ø  कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सर्वाच्या संपर्कात येणाऱ्या वस्तूंना  पृष्ठभागांना स्पर्श करु नये.
Ø  लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवावे. (किमान 3 फूट)
Ø  सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, संशयित व्यक्तींबाबत जिल्हा प्रशासनाला कळवावे.
Ø  नागरिकांनी या आजाराबाबत घाबरुन  जाता या आजाराबद्दल कोणत्याही अफवांपासून दूर राहावे  या आजाराबाबत सावधगिरी बाळगावी. शंका निरसनसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. (क्रमांक. 02562-237139) 
Ø  मागील 14 दिवसांमध्ये परदेशातून (कोणत्याही देशातून) आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनास कळविण्यात यावी, जर त्यांच्यामध्ये ‘करोना’ या आजाराची लक्षणे आढळून येत असतील, तर त्यांनी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात जावून तपासणी  उपचार करुन घ्यावेत.
Ø  या आजाराबाबत अतिरिक्त माहिती हवी असल्यास टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104 तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात टोल फ्री क्रमांक 1077  राज्य नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 020-26127394 शी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने