चित्रपट ,, विजेता ,, शरीराला मनाची साथ,, मनाची तयारी करून देणारा,,, एकजूट , एकसंघ अर्थात विजेता,,,,



       जय , विजय,  अपयश , यश हे शब्द आपल्याला काही नवीन नाहीत,  पास-नापास  होणे म्हणजे जीवनात एक अनुभव घेण्यासारखे असते , यशाची पायरी मोठी असतेच , पण त्यापूर्वी अपयश मिळाले तर एक वेगळा अनुभव आपल्या वाट्याला येतो.  अपयश ही  यशाची पायरी आहे. पायरी - पायरीने आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो, आणि  त्यासाठी आपली मानसीकता उत्तम राहणे  आणि ती ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे,  तुम्ही काम करताना तुम्हाला दर वेळेला यश मिळेल हे कठीण असते, प्रत्येक कामाची गती त्याची दिशा ठरलेली असते, एक पायरी उडी मारून तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलात तरी शेवटी सोडून दिलेल्या पायरीचा  हिशोब हा द्यावाच लागतो ..

      यशाकडे किंवा विजेता बनण्यासाठी तुम्ही प्रवास करीत असताना आपले शरीर हे तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे,  त्यामुळे ताकद मिळते उत्साह येतो,  काम करण्याची शक्तीसुद्धा आपल्याला मिळते, पण हे जरी खरं असलं तरी शरीराबरोबर मनाचा आपल्या बुद्धीचा आपल्या अनुभवाचा  वापर करणे हे अधिक महत्त्वाचे असते, त्याकडे लक्ष देणे हे अत्यंत गरजेचे आहे..

        विजयाच्या दिशेने वाटचाल करताना अनेक अडचणी येतात अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात कधीकधी आपले सहकारी सुद्धा साथ सोडतात , त्यांच्या मनात असूया निर्माण होऊ होऊ शकते,  स्पर्धेमध्ये हे प्रतिस्पर्धी वाढत जातात,  प्रत्येकाची मानसिकता ही वेगवेगळी असते आणि त्या मानसिकतेचा परिणाम आपल्या शरीरावर तसाच मनावर होऊ शकतो,,,  अशाच मध्यवर्ती कल्पनेवर लोकप्रिय निर्माते सुभाष घई यांनी त्यांच्या मुक्ता आर्ट्स या चित्रपट संस्थेतर्फे विजेता ची निर्मिती ती केली असून,  निर्माते राहुल पुरी हे आहेत.  सहनिर्माते सुरेश पै हे असून मुक्ता आर्ट्स चे सि ओ ओ हे आशिष गद्रे हे आहेत.  छायाचित्रण उदयसिंग मोहिते,  कथा आणि दिग्दर्शन अमोल शेटगे यांचे आहे.  संवादलेखन शिरीष लाटकर यांनी केले असून,  मंदार सातपुते , मंदार चोळकर, अमोल शेटगे   यांच्या गीतांना रोहन रोहन यांनी संगीत दिले आहे,  यामध्ये सुबोध भावे,  सुशांत शेलार , पूजा सावंत , प्रीतम कांगणे,  मानसी कुलकर्णी,  माधव देवचके,  अजित भुरे,  देवेंद्र चौगुले,  तन्वी परब,  दिप्ती धोत्रे,  कृतिका तुळसकर , सुहास पळशीकर,  अनुराधा राजाध्यक्ष , ललित सावंत , डॉक्टर दीपक नामजोशी,  गौरिष शिरपूरकर हे कलाकार आहेत.

      आपण आपले जीवन जगत असताना अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो.  ही कथा एका व्यक्तीची नसून अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखांचा यामध्ये समावेश केला आहे.  शिक्षण अभ्यास याशिवाय आपण खेळामध्ये सुद्धा प्रवीण होऊ  शकतो,  प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात एक सुप्त गुण दडलेला असतो,  ही कथा ऑलम्पिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळाडूंची आहे,  मागील काही वर्षात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी ही संतोषजनक नव्हती , आपल्या कामगिरीने मिळालेले अपयश हे पुन्हा प्राप्त होऊ नये यासाठी आपल्या खेळाडूंना व्यवस्थित प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे,  असे महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमीच्या डीन वर्षा कानविंदे यांच्या लक्षात येते , आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी भटकळ नावाचे क्रीडाशिक्षक हे मेहनत घेत असतात. त्यांच्या प्रयत्नाने खेळाडूंना हवे तसे  यश मिळत नाही.  भटकळ हे शारीरिक ट्रेनिंग देतात पण मनाच्या तयारीचे काय ?  याचा विचार कोणीच करत नाही,,  या खेळाच्या ॲकॅडमीमध्ये सायकलिंग , धावणे , बॉक्सिंग ट्रायथलॉन एथलिट,  वेटलिफ्टिंग ,  अशा विविध प्रकारचे खेळ महिला आणि पुरुष खेळाडू खेळत असतात, 

     खेळ कितीही उत्तम प्रकारे खेळाडूंनी खेळला तरी त्याला शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मानसिक तंदुरुस्ती असणे अत्यावश्यक असते.  त्यासाठी खेळाडूंची मानसिकता ही जपणे महत्त्वाचे आहे.  नुसते खेळायचे नाही तर जिंकायचेच आहे,  ही भावना आणि उमेद प्रत्येक खेळाडूकडे असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक खेळाडूला त्याचे दोष दाखवणे आणि त्याची मानसिकता सुधारणे आणि संघांमध्ये एकजूट तयार करून एकमेकाला साथ देत विजय प्राप्त करायचा असतो यावरती हा सिनेमा भाष्य करतो.

     नलिनी जगताप, सुनंदा गुजर, सोनिया कर्णिक,  राहुल थोरात,  जगदीश मोरे , देवेंद्र जाधव,  कविता कस्पटे,  सपना गायकवाड,  हे सारे ऑलम्पिक मध्ये भाग घेणारे खेळाडू आहेत त्यातील काहींना यश मिळाले आहे तर काही अपयशी आहेत. प्रत्येकाची  एक वेगळी कहाणी आहे, या सगळ्यांना भटकळ हे क्रीडाशिक्षक शिक्षित करीत असतात पण त्यांच्याकडे कितीही ही शारीरिक क्षमता असली तरी त्यांची मानसिकता एकसंघ करण्यासाठी सौमित्र  देशमुख यांची निवड केली जाते. तो  माईंड कोच असतो. खेळाडूच्या मनाचा अभ्यास त्याने जवळून पाहिलेला असतो , तो स्वतः उत्तम खेळाडू असतो.

     विजेता  झालेला खेळाडू हरला तर त्याला दुःख होते , पण त्या दुःखावर  मात करण्यासाठी मनाची तयारी असणे जरुरीचे असते,  आलेल्या संधीचा योग्य तो उपयोग करून त्यात आपले कौशल्य दाखवून विजय संपादन करायचा असतो..

     महत्वाचे हे असतं तुमच्याकडे फक्त कौशल्य असून चालत नाही तर कौशल्याचा योग्य वेळेला उपयोग करून घेता येणं हे महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही फक्त शारीरिक फिट असून चालत नाही,  त्याहीपेक्षा जास्त तुम्ही तुमच्या मनाची  तयारी करून घेणे हे महत्त्वाचं असतं तुमच्या मनाची तयारी कशी वाढेल यावरती सिनेमा भाष्य करतो,,  आणि खेळाडूंच्या मनाची तयारी करून मैदानात पुन्हा नव्या जोमाने आणण्याचे काम माईंड  कोच करीत असतो. ह्या माईंड कोच  असणाऱ्या शिक्षकाला खेळाडूचे मानसशास्त्र अभ्यासावे लागते,  आणि त्याचा उपयोग खेळाडूसाठी कसा करायचा हे अधिक चांगल्या प्रकारे माहीत असते.

        तुम्ही जिंकणार आहात आणि तुमच्या गळ्यात मानाचे अर्थात पहिल्या नंबरचे पदक मिळालेले आहे,  ही मानसिकता खेळाडूची वाढवणे खूप महत्त्वाचे  आहे,  तुम्हाला जिंकायचेच आहे आणि तुम्हाला विजेता बनायचे आहे , असे सांगून खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याचे महत्त्वाचे काम माईंड कोच करीत असतो ..

या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी उत्तम केले आहे, चित्रपट गतिमान ठेवला आहे, प्रत्येक खेळाडूची व्यक्तिरेखा त्यांनी सुरेख मांडली असून त्या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय प्रत्येक कलाकाराने दिलेला आहे. उत्तम टीम वर्क असलेला हा चित्रपट आहे. पूजा सावंत,  प्रीतम कांगणे,  तनवी परब,  देवेंद्र चौगुले,  गौरिश शिरपूरकर,  माधव देवचके,  कृतिका तुळसकर,  दिप्ती धोत्रे,  यांची सर्वांची कामे खूप छान झाली आहेत.  त्यांनी आपल्या व्यक्तीरेखेला योग्य तो न्याय दिलेला आहे.  सुशांत शेलार , सुबोध भावे यांनी आपल्या व्यक्तिरेखा उत्तमच साकारल्या  आहेत, शेवटी सौमित्रला यश मिळते का ? महाराष्ट्राचा संघ सामन्यामध्ये विजयी होतो का ? सौमित्रला त्याचे खेळाडू कशी साथ देतात ? भटकळ यांची प्रतिक्रिया काय असते ? वर्षा कानविंदे यांचा अंदाज बरोबर ठरतो का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास विजेता ह्या सिनेमात मिळतील . एक उत्तम टीमवर्क असलेला एकसंघ एकजुटीचे महत्व काय असते ह्यावर सिनेमा भाष्य करतो.

     विविध खेळांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा एकजुटीने विजेता  बनला आहे,  खेळ आणि आयुष्य यामध्ये हे फारसा काही फरक नसतो,  आयुष्यामध्ये यश-अपयश येत असते,  चढ-उतार असतात,  खेळामध्ये सुद्धा तसेच असते,,,, हरताना जिंकणे यासाठी मनाची तयारी आणि उमेद असणे गरजेचे असते असा एक संदेश हा चित्रपट देऊन जातो.

दीनानाथ घारपुरे  ९९३०११२९९७

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने