शिरपूर (प्रतिनिधी) : शिवरायांनी रयतेचे, गोरगरीबांचे राज्य निर्माण केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे रयतेचे, गोरगरीबांचे राज्य निर्माण करत आहे. अलीकडेच सरकारला सत्तेवर येवून पूर्ण झालेले शंभर दिवस, शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी त्यासह अन्य लोकोपयोगी निर्णय हे कल्याणकारी राज्याचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे केले.
शिरपूर येथील शिवसेना कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार (दि. 12 रोजी) जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जय जवान, जय किसान हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अपर्ण करण्यात आला. तसेच कर्जमुक्त झालेल्या 30 शेतकऱ्यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यासह शिरपूर तालुक्यातून सैन्य दलात भरती झालेल्या चार जवानांचा ही सन्मान करण्यात आला. यावेळी साळुंके बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सोळाव्या शतकात शिवरायांच्या जन्मावेळी कुठल्याही प्रकारचे कॅलेंडर नव्हते. इंग्रजी महिना नव्हता. पूर्वी प्रत्येक गोष्ट ही तिथीनुसार साजरी व्हायची. त्यानुसार खरी शिवजयंती तिथीनुसारच असते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सरकार हे शेतकरी, गोरगरीब, कैवारींचे सरकार आहे. मागील सरकारने कर्जमाफीची योजना राबवली. परंतु त्यातील जाचक अटींमुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. मागील सरकार हे फसवे सरकार आहे. हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या लक्षात आल्यानेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सत्तेत येताच शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलेल्या वचनाची पूर्ती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या रुपाने केली. या कर्जमाफीमुळे प्रत्येक पाचशे ते सातशे लोकवस्तीच्या छोट्याशा गावात देखील 70 टक्के शेतकरी हे कर्जमुक्त झाले आहेत. त्यासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 टक्के प्रोत्साहन अनुदान ठाकरे सरकारने जाहीर केले आहे. एवढा चांगला निर्णय आजपर्यंत कुठल्याही सरकारने घेतलेला नाही असेही साळुंके यांनी नमुद केले. तसेच शिरपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जय जवान जय किसान सारखा एवढा चांगला उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.
याप्रसंगी तालुका प्रमुख भरतसिंह राजपूत, उपजिल्हाप्रमुख हिंमतराव महाजन, शहरप्रमुख मनोज धनगर, एस.टी.कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू टेलर, मंगेश आबा पाटील, भाईदास पाटील, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, विधानसभा संघटक छोटूसिंग राजपूत, उपतालुका प्रमुख राजेश गुजर, शहर प्रमुख बंटी लांडगे, उपशहर प्रमुख प्रशांत महाजन, दिलीप माळी, विभाग प्रमुख दिपक चोरमले, पिंटु शिंदे, पदमसिंग जाधव, उपतालुका प्रमुख योगेश सूर्यवंशी, अभय भदाणे, रविंद्र जाधव, अत्तर पावरा, विजय पावरा, कुबेर जमादार, भायली पावरा, रोहिदास पावरा, विकास सेन, बबलू शेख, मसुद शेख, रेहान काझी, वाजीद मलिक, बळीराज बंजारा, यांच्यासह शेतकरी, नागरीक व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news