कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी व्हावे धुळे जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचे आवाहन

       


 

 

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) :धुळे जिल्ह्यात कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून आणि ‘कोरोना’ विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला आहे. या कर्फ्यूमध्ये धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

‘जनता कर्फ्यू’ पाळावा

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले, ‘कोरोना’ या विषाणूचा प्रादुर्भाव सुरवातीला चीनमध्ये आढळून आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 118 देशात या विषाणूची लागण झाली आहे. जगात आतापर्यंत सुमारे दोन लाख नागरिकांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी सुमारे दहा हजार नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी रविवार 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीत नागरिकांनीच ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले आहे. असेच आवाहन राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनीही केले आहे.

‘कोरोना’ विषाणूची लक्षणे

‘कोरोना’ विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडित असून त्यात सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, न्यूमोनिया, ताप आदींचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने बाधित रुग्णांचे खोकणे, शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित अतिसूक्ष्म थेंबाद्वारे त्याचप्रमाणे दूषित जागांच्या संपर्काद्वारे, हस्तांदोलन आदींमुळेही होतो. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. तसेच या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षांवरील व्यक्ती, फुफ्फुसाचे आजार असलेल्या व्यक्ती, तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्ती, गर्भवती माता, लहान बालके, मधुमेह, कर्करोग, किडनीचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी वेळोवेळी व जेवणापूर्वी हात साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. 

शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष कार्यान्वित

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ‘कोरोना’ प्रतिबंधक म्हणून विविध उपाययोजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये ‘कोरोना’ क्वारंटाइन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय, धुळे (30 खाटा), श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे (30 खाटा), एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय, धुळे (40 खाटा), सर्व ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये मिळून 65 खाटा विलगीकरण कक्षासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. संशयित रुग्णांच्या घशातील द्रावाची तपासणी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे दवाखाने, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वसाधारण तपासणी करण्यात येत आहे. सीमा तपासणी नाके, टोलनाके, रेल्वे स्थानक येथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात सुविधा

जिल्हास्तरावर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या आजारासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या आयसेलोशन वॉर्डात 6 खाटा व चार व्हेंटिलेटर तज्ज्ञ डॉक्टरांसह उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिल्हास्तरावर सद्य:स्थितीत एकूण 24 संशयित प्रवाशांना होम क्वारंटाइनसाठी अलगीकरण केले आहे. त्यापैकी सात संशयितांच्या घशातील द्रावणाचे नमुने घेतले असून त्यापैकी पाच संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन संशयितांच्या अहवाल प्रलंबित आहेत. धुळे जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही ‘कोरोना’ विषाणू बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात 24 तास साथरोग कक्ष कार्यरत

आरोग्य विभागातर्फे जिल्हास्तरावर ‘कोरोना’ आजारासंदर्भात 24X7 साथरोग कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे जिल्ह्यातील क्वारंटाइन संशयित रुग्णांचा दूरध्वनीद्वारे दैनंदिन विचारणा करून अहवाल सादर करीत आहेत. साथरोगय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02562- 237139 असा आहे. तालुकास्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोग कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून दैनंदिन सर्वेक्षण करून विदेशातून आलेल्या प्रवाशांची व संशयित रुग्णांची माहिती जिल्हा कक्षाकडे सादर करण्यात येत आहे. रजेवर गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी धुळे जिल्ह्यात आपत्ती व्यवसापन कायदा लागू करण्यात आला आहे. याशिवाय अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेलमधील अथवा अन्य वास्तूमधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमीटरूम, बिअरबार, उद्याने, संग्रहालये, ऑनलाइन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, अंगणवाड्या, मेळावे, यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, दिंड्या, ऊरुस, पदयात्रा आदींवर पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ‘कोरोना’विषयी अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांविरुध्द पोलिस दलाच्या सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक, धुळे यांना देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने, निवेदने, रास्ता रोको, धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालयातील उपस्थितीवर निर्बंध

‘कोरोना’ विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील काही दिवस स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. अति आवश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.

 

* धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग बंद

* धुळे जिल्ह्यातील चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे बंद

* धुळे जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार

* धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य ग्रामस्थ व पर्यटकांसाठी बंद

* नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास थांबू शकतो ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार

* मास्क व औषधांची साठेबाजी व जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

*  ‘कोरोना’ विषाणू विषयी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

00000


-- 



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने