धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व बँकांनी एका वेळेस 4 ते 5 ग्राहकांनाच बँकेत प्रवेश द्यावा, तसेच 31 मार्च 2020 पर्यंत रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्यांनी करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व बँकांनी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. तसेच कोरोना विषाणुच्या प्रसाराचे माध्यम पहाता, सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस/ इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेता तसेच आर्थिक वर्षाच्या कामकाजासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन या विषाणुचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. पुढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
Ø सर्व बँकांनी 31 मार्च 2020 पर्यंत फक्त रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावी.
Ø बँकांनी एका वेळेस जास्तीत जास्त 4 ते 5 ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकाला बँकेत आत प्रवेश देऊ नये, दोन ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर ठेवावे
Ø सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायाचा म्हणजेच इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग व युपीआय, एटीएम, कॅश डीपॉझीट मशीन आदि सुविधांचा वापर करणेबाबत जागृती व आवाहन करावे.
Ø बँकेत ग्राहकांना काऊन्टर पासुन 1 मीटर अंतर ठेवण्यास सुचित करावे.
Ø सर्व बँकांनी आपल्या एटीएम, कॅश/ चेक डीपॉझीट, पासबुक प्रिंटींग इत्यादी सेवा असणाऱ्या मशीनची वेळोवेळी स्वच्छता करावी. सर्व कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना सॅनिटायझर, हँडवॉश, जंतुनाशक अथवा साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID-19) उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री.गंगाथरन डी. यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000