धुळे, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदांकरीता महापरीक्षा पोर्टलमार्फत झालेल्या परीक्षेसाठी प्रवीष्ट उमेदवारांच्या गुणांची यादी www.dhule.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या गुणांच्या यादीबाबत, समाविष्ट नावांबाबत हरकत, तक्रार असल्यास तक्रारीच्या पुराव्यासह महापरीक्षा पोर्टल (माहिती व तंत्रज्ञान) मुंबई यांच्याकडे तक्रार नोंदवून त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात 24 जानेवारी 2020 पर्यंत सादर करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, तलाठी भरती- 2019 या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील तीन केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या एकत्रित गुणांची यादी (राज्यस्तरीय) महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर 7 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिध्द झाली. या परीक्षेत धुळे जिल्ह्यातील पदांकरीता प्रवीष्ट झालेल्या परीक्षार्थींच्या गुणांची यादी महापोर्टल कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
या गुणांच्या यादीबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यानुसार तलाठी (गट- क संवर्ग) पदाच्या परीक्षेचा जिल्हानिहाय निकाल जाहीर करण्यास जिल्ह्याची निवड समिती सक्षम असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदांकरीता महापरीक्षा पोर्टलमार्फत झालेल्या परीक्षेत महापोर्टलने कळविलेल्या माहितीच्या आधारे प्रवर्गनिहाय प्रवीष्ट झालेल्या उमेदवारांच्या गुणांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
Tags
news
