पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी धुळे जिल्ह्यात 1150 लसीकरण केंद्रे



धुळे, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रविवार 19 जानेवारी 2020 रोजी धुळे जिल्ह्यातील 1150 लसीकरण केंद्रांवर पाच वर्षांच्या आतील 1 लाख 90 हजार 165 बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. पालकांनी पाच वर्षांच्या आतील बालकांना डोस द्यावेत, असे आवाहन जिल्हा समन्वयक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. 
राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 19 जानेवारी 2020 रोजी धुळे जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची तयारी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा समन्वयक समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. उपस्थित होत्या. सर्व अतिजोखमीच्या कार्यक्षेत्राकडे विशेष लक्ष देवून एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण, अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजकल्याण, स्वयंसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, एन. एस. एस. महिला मंडळ, बचत गटांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. संबंधितांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. चारही तालुक्यांना त्यांचे लसीकरण बूथ, लाभार्थी, घरभेटीचे पथक, ट्रान्झिट टीम, मोबाईल टीमनुसार अनुदान वितरीत करण्यात आले आहे. पोलिओचे डोस देण्यासाठी बायव्हायलेट पोलिओ लस 2 लाख 30 हजार प्राप्त झाली असून तिचे वाटप करण्यात येत आहे. शीत साखळी अबाधित ठेवण्यासाठी आइस पॅक तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.
बसस्थानक, रेल्वे स्थानक, ऊस तोड कामगार, वीटभट्टी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना लस देण्यासाठी ट्रान्झिट व मोबाईल पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या आतील एकही बालक लस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. 19 जानेवारी 2020 रोजी जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार 165 बालकांना पोलिओ डोस देण्यात येतील. त्यासाठी 1150 लसीकरण केंद्रे असतील. प्रत्यक्ष बूथवर डोस देणे, बालकांना बोलावून आणण्यासाठी 3370 कर्मचारी नियुक्त असतील. 319  अधिकारी व कर्मचारी पर्यवेक्षण करतील. तसेच चारही तालुक्यांच्या पर्यवेक्षणासाठी 11 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. बसस्थानक, रेल्वे स्थानक, तपासणी नाके येथे 61 ट्रान्झिट पथके कार्यरत असतील. भटके कामगार, वीटभट्टी, ऊसतोड, रोड कामगारांच्या बालकांसाठी 90 मोबाईल पथके कार्यरत असतील. जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 64 वैद्यकीय अधिकारी या मोहिमेचे नियोजन करीत आहेत.
या मोहिमेची प्रचार व प्रसिध्दी विविध माध्यमातून केली जात आहे. खासगी डॉक्टरांनाही त्यांच्याकडे येणाऱ्या पालकांना पोलिओ डोस घेण्यासाठी माहिती देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. पाच वर्षांच्या आतील बालकाच्या प्रत्येक पालकाने आपल्या बालकास पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने