कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव



शहादा दि.१७ कलेच्या रंगात निर्मिती आणि ज्ञानाचे रंग भरण्याचा प्रयत्न करुन त्या आधारे तरुण पिढीने भारताच्या दरडोई घरगुती उत्पादनात वाढ करण्याची प्रतिज्ञा करावी असे प्रतिपादन अणूशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पू.सा.गु.विद्याप्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाचे उदघाटन डॉ. काकोडकर यांच्या हस्ते शुक्रवारी प्रचंड जल्लोषात झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहूलीकर होते. यावेळी संस्थेच्या मानद सचिव कमलाताई पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर संस्थेचे संचालक रमाकांत पाटील, हैदरभाई नुराणी , प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे, युवारंग कार्याध्यक्ष दीपक पाटील, व्य.प.सदस्य प्रा.नितिन बारी, प्रा. मोहन पावरा, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य लता मोरे, प्रा.पी.पी.छाजेड, प्राचार्य आर.एस.पाटील, सिलेजचे समन्वयक डॉ.एस.टी.बेंद्रे, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, अमोल मराठे, दिनेश खरात, दिनेश नाईक,अमोल सोनवणे, पोलीस उपअधिक्षक पुंडलीक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपस्थित होते.
डॉ.काकोडकर आपल्या भाषणात म्हणाले की, कले सोबत जीवनात पुढे जायचे असले तर तरुणाई शिवाय अशक्य आहे. या युवारंग मधून सादर होणाऱ्या कलारंगासोबत निर्मिती आणि ज्ञानरंगाची जोड द्या. जगात भारत हा अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी भारताचे दरडोई घरगुती उत्पादन कमी आहे. तो वाढविण्याची प्रतिज्ञा तरुणांनी करावी असे आवाहन करतांना भारतात लोहखनिज उत्तम दर्जाचे असतांनाही त्याची निर्याती पेक्षा आयात अधिक आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत आपण कमी पडत आहोत. जगाच्या तोडीचे व स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचे तंत्रज्ञान निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे. यातून शहर आणि खेडी यातील दरी कमी होईल. युध्दयुगाकडून ज्ञानयुगाकडे आपण जात आहोत यामध्ये ग्रामीण भागात अधिक संधी आहे. ज्ञानयुगाची पावले ओळखून तयारी करतांना स्थानिक गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान निर्मिती केली तर ग्रामीण भागात शेतीत क्रांती होईल या शिवाय जोडधंदे अधिक चालतील असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पाचा उल्लेख करतांना नवीन तंत्रज्ञानाची ग्रामीण भागात ओळख करुन देणे हा सिलेजचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाने सुरु केला असल्याचे नमूद केले. दिलीप पाटील यांनी महोत्सव म्हणजे कलाविष्काराची संधी आणि सुजान नागरिक तयार करण्याची प्रक्रिया असल्याचे सांगितले. प्राचार्य आर.एस.पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेची वाटचाल सांगितली. कार्याध्यक्ष दिपक पाटील यांनी भाव-भावना व्यक्त करण्यासाठी हा महोत्सव असल्याचे सांगितले. विद्याथी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक करतांना १२१ महाविद्यालयांच्या २ हजार २०० विद्यार्थी / व्यवस्थापक यांची नोंदणी झाली असल्याचे सांगितले.
यावेळी गौरव पाटील व प्रिती काकुडदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. प्रारंभी युवारंग, विद्यापीठ आणि महाविद्यालयचे ध्वजाचे आरोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी पी.के.पाटील, बहिणाबाई चौधरी व नटराजाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले व दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलक डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. समन्वयक व उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने