शिरपूर येथे सुनेने अग्निडाग दिला सासूला, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या आई कै. जावत्राबाई चव्हाण यांच्या मृतदेहाला अग्निडाग दिला सून प्रमिलाबाई चव्हाण यांनी





शिरपूर  - आतापर्यंत आपण समाजात कोणी गेल्यानंतर प्रेताला अग्नीडाग दिलेल्या मुलगा, मुलगी, नातू अशा प्रकारची अनेक उदाहरणे बघितलेली आहेत. मात्र शिरपूर येथे सासूला सुनेने अग्नीडाग दिल्याचं एक आदर्श उदाहरण पहायला मिळाले.

शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी शहरातील माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्या १०१  वयाच्या आई जावत्राबाई तुकाराम चव्हाण यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता शहरातील माळी गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात आली.

यावेळी जावत्राबाईंच्या अंत्ययात्रेत माणसांसोबत त्यांच्या परिवारातील महिला देखील सामील झाल्या होत्या. अमरधाम येथे त्यांच्या परिवारातील महिला अग्निडाग देताना उपस्थित होत्या.


जावत्राबाई यांना १०१ वर्षे वयाचे आयुष्य लाभले. त्या बऱ्याच कालावधीपासून वार्धक्याने चालू शकत नव्हत्या. अशा अवस्थेत प्रभाकरराव चव्हाण यांच्या पत्नी व जावत्राबाई यांच्या सून प्रमिलाबाई चव्हाण यांनी त्यांची आईसारखे सेवा केली.जावत्राबाई यांना चालताही येत नव्हते. या वेळी प्रमिलाबाई त्यांना व्हीलचेअरवर बसून गल्लीत फिरवत असत. सातत्याने त्यांची सर्व काळजी प्रमिलाबाई घेत होत्या. बर्‍याचदा जावत्राबाई ह्या  गल्लीत प्रमिलाबाई यांना सासूच्या अधिकाराने मारत  पण असत. जावत्राबाई यांचा स्वभाव कणखर असल्याने त्या मोठ्या प्रमाणावर प्रमिलाबाई यांना रागवत पण असत. मात्र तरीही प्रमिलाबाई यांनी त्यांची आईसारखे सेवा केली. त्यामुळेच सर्व परिवाराची इच्छा होती की, ज्या सुनेने सासूची आईसारखी सेवा केली आहे त्या सुनेनेच जावत्राबाईंना अग्नीडाग द्यावा, असे चव्हाण परिवारात ठरवण्यात आले.
 जावत्राबाईंनी शतक पार केल्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. तसेच शहरातील त्यांच्या माळी गल्ली येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा वाजत-गाजत काढण्यात आली. यावेळी अमरधाममध्ये जेथे त्यांच्या शरीराला अग्निडाग देण्यात आला ती जागा फुलांनी सजवण्यात आली होती.

जावत्राबाईंच्या अंत्ययात्रेला राजकारण तसेच सामाजिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर मंडळी उपस्थित होती. यात माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार, राजवर्धन कदमबांडे, हिलाल माळी, सतिष महाले, माजी आमदार शरद पाटील, कामराज निकम, संजय शर्मा, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तरसिंग पावरा, अनेक क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने