.
धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ सप्ताह 20 ते 26 जानेवारी 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियानाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
सोमवार 20 जानेवारी 2020 रोजी उदघाटन, जिल्हा व तालुका समितीची बैठक, प्रतिज्ञा सोहळा, 21 जानेवारी रोजी प्रभात फेरी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त गृहभेटी, 22 जानेवारी रोजी स्त्री जन्माबाबत शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करणे, पोस्टर, म्हणी लिहिणे, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
23 जानेवारी रोजी बेटी बचाओ- बेटी पढाओ याविषयी समुदाय बैठक आयोजित करणे, धार्मिक, राजकीय पदाधिकाऱ्यांसमवेत कार्यक्रम घेणे, स्थानिक चॅम्पियन्स तयार करणे, जनजागृती करणे. 24 जानेवारी रोजी ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’बाबत फोटो बुक तयार करून प्रकाशित करण्यात येईल. जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यात पथनाट्य, नुक्कड, चित्रपटांचा खेळ, लोकमाध्यम, पपेट शो आदींचा समावेश असेल. गाव पातळीवर मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात येईल. याशिवाय मुलींच्या नावाने वृक्षारोपण करण्यात येईल.
25 जानेवारी रोजी बाललिंग गुणोत्तराबाबत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल. मुलीच्या नावांचे फलक घरांवर लावण्यात येतील. आई व बालकांचा सत्कार करण्यात येईल. 26 जानेवारी 2020 रोजी या उपक्रमांचा समारोप होईल, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
Tags
news
