माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपातर्फे शिरपूर पंचायत समितीच्या सभापती पदी सत्तरसिंग पावरा व उपसभापती पदी सौ. धनश्री बोरसे यांची बिनविरोध निवड



शिरपूर - शिरपूर पंचायत समितीवर माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी चा झेंडा फडकला असून पंचायत समितीच्या सभापती पदावर सत्तरसिंग नारखा पावरा तर उपसभापती पदावर सौ. धनश्री योगेश बोरसे यांची वर्णी लागली असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा जनकव्हीला निवासस्थानी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नगरसेवक तपनभाई पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जि. प. सदस्य तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, अशोक कलाल व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार कार्यालय येथे अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजता सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांशी चर्चा करून सभापती पदासाठी फत्तेपूर फॉ. गणातील सत्तरसिंग नारखा पावरा (रा. मालकातर) व उपसभापती पदासाठी भाटपुरा गणातील सौ. धनश्री योगेश बोरसे (रा. पिळोदा) यांची नावे जाहीर करण्यात आली.
त्यानंतर पंचायत समितीच्या अमरिशभाई पटेल सभागृहात सभापती पदासाठी सत्तरसिंग नारखा पावरा व उपसभापती पदासाठी सौ. धनश्री योगेश बोरसे दोघांचे एक एक नामांकनपत्र दाखल करण्यात आले. तहसीलदार आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी तीन वाजता सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्यांची सभा घेण्यात येऊन यावेळी सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा तहसीलदार आबा महाजन यांनी केली. यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा तहसीलदार आबा महाजन व गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती मध्ये तालुक्यातील अनेक पदाधिकारी, नातेवाईक यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकााी यांचा सत्कार करण्यात आला.
शिरपूर तालुक्यात माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदांचे 14 पैकी 14 गट भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आले असून शिरपूर पंचायत समितीच्या 28 गणांपैकी 24 गणांमध्ये देखील भाजपाचे उमेदवार मोठया मताधिक्याने निवडले आहेत. उर्वरित तिन अपक्ष उमेदवार यांनी देखील अमरिशभाई पटेल यांना म्हणजेच भाजपा ला पाठींबा दिलेला असल्याने 28 पैकी 27 पं.स. सदस्य हे भाजपा कडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त एक उमेदवार विरोधात असल्याचे चित्र आहे.
नवनिर्वाचित सभापती सत्तरसिंग पावरा हे अमरिशभाई पटेल यांचे कट्टर समर्थक आहेत. मालकातर ग्रामपंचायतीवर त्यांचीच सत्ता आजपर्यंत आहे. ते दहावी शिकले असून 59 वर्षांचे आहेत. त्यांच्या परिवारातील अनेक सदस्य चांगले शिक्षित असून नोकऱ्यांमध्ये आहेत. तसेच सौ. धनश्री योगेश बोरसे हया 29 वर्षीय असून बी.एस्सी. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. कुसुंबा हे त्यांचे माहेर व पिळोदा हे त्यांचे सासर आहे. त्यांचे पती योगेश बोरसे यांनी गेल्या वर्षी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद भूषविले असून ग्रामपंचायतीत देखील त्यांचे वर्चस्व आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने