शिरपूर - मनुष्यबळ विकास मंत्रालय नवी दिल्ली, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निष्ठा हे प्रशिक्षण प्राथमिक शिक्षकांसाठी व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात दि. 20 जानेवारी रोजी शहरातील आर. सी. पटेल अध्यापक विद्यालय शिरपूर येथे झाली. प्रशिक्षणाचे उदघाटक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.डी.बी. साळुंखे यांचे शुभ हस्ते झाले. शिक्षण विस्तार अधिकारी बी.एस.बुवा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्राचार्य जे.एल.चौधरी उपस्थित होते.
डॉ. डी. बी. साळुंखे यांनी आपल्या प्रस्ताविकातून ‘निष्ठा’ या प्रशिक्षण वर्गाचे प्रयोजन, उद्देश, पार्श्वभूमी आणि वेगळेपण या मुद्द्यांच्या अनुषंगाने एकूणच प्रशिक्षण वर्गाचा सारांश मांडला. जुने ते सोडून नव्याचा तंत्राचा व्यासंग घेऊन अध्यापनात तंत्रज्ञान गरजेचे झाले असून कोणत्या तंत्रज्ञानाचा शिक्षक उपयोग करु शकतो याचा आढावाही त्यांनी घेतला.
प्राचार्य जे.एल.चौधरी यांनी शैक्षणिक संशोधन हे बदलत्या धोरणात कसे गरजेचे आहे आणि त्यातून चिकित्सक वृत्ती कशी वाढू शकते याबद्दल माहिती देत अधिक संशोधनाचे आवाहन केले. स्वच्छतेचे महत्व विशद केले. उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी बी.एस. बुवा यांनी प्रशिक्षण वर्गाचे महत्व विशद करत प्राथमिक शिक्षक हा सर्वच आव्हानांना सामोरे जाण्यास नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी आर.के.गायकवाड हे प्रशिक्षण वर्गांचे नियंत्रक म्हणून जबाबदारी पाहत आहेत. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जुबेर काझी, के.बी.पवार, स्वप्नील सूर्यवंशी, सचिन जडीये, विजयानंद शिरसाठ हे प्रशिक्षण देत आहेत.
या प्रशिक्षणासाठी श्रीमती प्रमिला मुडावदकर, श्रीमती अरुणा पाटील हे परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जडीये यांनी केले. आभार के.बी.पवार यांनी मानले.
शिरपूर तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप् रमुख व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी या प्रशिक्षणाचा लाभा घ्यावा असे आवाहन धुळे डाएटच्या प्राचार्य डॉ.विद्या पाटील यांनी आवाहन केले आहे.
Tags
news
