जीवनातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावा, जीवनात खूप मोठे व्हा - माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे आवाहन






शिरपूर - शिक्षण, क्रीडा व विविध क्षेत्रात आर. सी. पटेल शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करत असल्याची बाब खूप कौतुकास्पद आहे. संस्थेचा व शिरपूरचा नावलौकिक राज्यात व देशात होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. आवडीच्या क्षेत्रात मुलांना पालकांनी टाकावे. आम्ही सर्वार्थाने विद्यार्थ्यांना पूर्णपणे सहकार्य करतो परंतु पालकांनी देखील मुलांकडे लक्ष घालावे. विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. येत्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात शिरपूर अग्रेसर राहील. अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यापुढे स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. जीवनातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावा.आपल्या जीवनात खूप मोठे व्हा असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले.

येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलात संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून ॲम्बिशन क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

बुधवार दि. 15 जानेवारी रोजी आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर सकाळी 9 वाजता या ॲम्बिशन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, आमदार काशिराम पावरा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, प्रो-कबड्डी प्लेअर महेंद्र राजपूत धुळे, संस्थेचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, विश्वस्त बबनलाल अग्रवाल, कमलकिशोर भंडारी, शिरपूर पिपल्स बॅंक चेअरमन योगेश भंडारी, शिरपूर मर्चंट बॅंक चेअरमन प्रसन्न जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनिस, फिरोज काझी, नाटूसिंग गिरासे, श्रेणीक जैन, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, पी. व्ही. पाटील, डॉ. शारदा शितोळे, दिनेश राणा, निश्चल नायर, क्रीडा प्रमुख सिद्धार्थ पवार, रवि बेलाडकर, डॉ. एस. बी. बारी, आर. बी. भदाणे, मनोहर वाघ, जे. एल. चौधरी, अनिता थॉमस व अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भव्य रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. २१ माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय भारत बाबत विविध राज्यांच्या झाक्या सादर केल्या. यात आर.सी. पटेल उर्दु माध्यमिक विद्यालय शिरपूर ने काश्मीर राज्याची संस्कृतीवर आधारित झाकी सादर केली. तसेच मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हिमाचल प्रदेश मधील संस्कृतीचे दर्शन घडविले. आर. सी. पटेल विद्यालय टेकवाडे उत्तरांचल, आर. सी. पटेल विद्यालय खंबाळेने पंजाब राज्याची संस्कृती, भोरखेडा विद्यालयाने हरियाणा तर बभळाज विद्यालयाने उत्तर प्रदेश, गरताड विद्यार्थ्यांनी बिहार तर अहिल्यापुर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आसाम, तसेच भामपूर विद्यालयाने नागालँड, भामपुर विद्यालयाने नागालँड, सावळदे विद्यालयाने पश्चिम बंगाल, खर्दे विद्यालयाने झारखंड, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल ने ओडिसा, आर. सी. पटेल मराठी विद्यालय शिरपूर ने आंध्र प्रदेश, एच. आर. पटेल कन्या विद्यालय ने तामिळनाडू, होळनांथे आर.सी. पटेल विद्यालयाने केरळ, वरुळ येथील एच. आर. पटेल विद्यालयाने कर्नाटक, झेंडेअंजन विद्यालयाने गोवा, निमझरी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, वाघाडी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी गुजरात, शिरपूर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश राज्याची संस्कृती तर पिळोदा येथील आर.सी. पटेल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजस्थान राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व माध्यमिक शाळांचे २५ क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रमुख तसेच विविध खेळांचे २२ तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षक यांनी प्रयत्न केले.

क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळ प्रकारात 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे व रिले 100 मीटर धावणे, गोळा फेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी या मैदानी खेळांचा, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन या इनडोअर खेळ प्रकारांचा तर सांघिक स्पर्धेसाठी क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला. पहिल्या टप्प्यात सदर स्पर्धा या शालेय स्तरावर इयत्ता पाचवी ते अकरावी पर्यंतच्या (१४ व १७ वर्षा आतील मुले/मुली) वर्गासाठी राबविण्यात आल्या. शाळेतील विजेता खेळाडू दुसऱ्या टप्प्यात नेमून दिलेल्या क्लस्टर स्तरावर स्पर्धा करतात. संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांना सोयीनुसार 4 क्लस्टर मध्ये विभागण्यात आले.


 शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर सर्व अंतिम स्पर्धा संपन्न होवून विजेत्यांना गौरविण्यात आले.


क्रीडा महोत्सवात संस्थेतील उत्कृष्ट खेळाडूंना एकूण २७६८ बक्षिसे देण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने