धुळे, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आयोजित 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. दीपक डोंगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम भोसले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक श्री. काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जे. जे. पवार, जयंत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी विविध माहिती पत्रकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच माध्यम प्रतिनिधींना रस्ता सुरक्षा फाऊंडेशनतर्फे हेल्मेटचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.
महापौर श्री. सोनार म्हणाले, अपघात टाळण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून त्यावर उपाययोजना करावी. वाहन खरेदी करताना सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. हेल्मेटचा वापर करताना ते लॉक झाल्याची खात्री करून घ्यावी. रस्ता हा सर्वांसाठी असून सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे, याची जाणीव प्रत्येक वाहन चालकाने ठेवत वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. सायकलचा वापर वाढवावा, असेही त्यांनी आवाहन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डोंगरे यांनी नवीन मोटार वाहन कायद्याची माहिती देत रस्ता सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कळसकर यांनी रस्ता सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी, महानगरपालिका, पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाहन चालक- मालक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
news
