साने गुरुजी महाविद्यालयात रंगणार येत्या 16 तारखेपासून युवारंग चा जल्लोष




 प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही राहणार उपस्थित

प्रतिनिधी- कल्पेश राजपूत, शहादा

शहादा ता.12, शहादा तालुक्यातील लोणखेडा महाविद्यालय येथे १६ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या युवा महोत्सवात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२५ महाविद्यालयातील सुमारे अडीच हजार युवक - युवती समावेश आहे . युवारंगचा उद्घाटन सोहळा १७ जानेवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या स . इ . पाटील कला , गि . बा . पटेल विज्ञान आणि खरेदी - विक्री संघाचे वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्तविद्यमाने युवारंगचे दुसऱ्यांदा विद्यापीठस्तरीय आयोजन करण्यात आले आहे . गेल्यावर्षी नंदुरबार जिल्हास्तरीय युवारंगाचे यजमान पद भूषविण्याची संधीही महाविद्यालयाला मिळाली होती . विद्यापीठ प्राधिकरणाने शहादा महाविद्यालयावर युवारंगची जबाबदारी दिली असून मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील , उपाध्यक्ष किशोर पाटील , सचिव कमलताई पाटील , समन्वयक प्रा . मकरंद पाटील , पी . आर . पाटील यांचे मार्गदर्शन व संचालक मंडळाच्या प्रोत्साहनाने महाविद्यालय युवक महोत्सवासाठी सज्ज झाले आहेत.युवारंग मध्ये पाच कला प्रकरचा समावेश करण्यात आला आहे . यात संगीत प्रकारात शास्त्रीय गायन , शास्त्रीय वादन ( ताल वाद्य व सूर वाद्य ) , सुगम गायन ( भारतीय व पाश्चिमात्य ) , समूहगीत ( भारतीय व पाश्चिमात्य ) , लोकसंगीत , भारतीय लोकगीतांचा समावेश आहे . नृत्य प्रकारात समूह लोकनृत्य व शास्त्रीय नृत्याचा समावेश असून साहित्य कला या प्रकारात वक्तृत्व , वादविवाद , काव्यवाचन स्पर्धेचा समावेश आहे . नाट्य कला प्रकारात विडंबन नाट्य , मूकनाट्य व मिमिक्री स्पर्धेचा समावेश असून ललित कला या प्रकारात रांगोळी , चित्रकला , कोलाज व्यंगचित्र , क्ले मॉडलिंग , फोटोग्राफी , इंस्टॉलेशन , मेहंदी या कला प्रकारांचा समावेश आहे .
युवारंगच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर . एस . पाटील , युवक महोत्सव समन्वयक उपप्राचार्य डॉ . एम . के . पटेल यांनी विविध समित्यांची स्थापना केली आहे . समिती प्रमुखांसह प्रत्येकी दहा ते पंधरा सदस्यांची समिती बनविण्यात आली आहे . यात स्वागत , नोंदणी , निवास , भोजन , शिस्त , रंगमंच संचालन , छायाचित्रण , प्रसिद्धी , विद्युत पुरवठा , वाहनतळ आदी समित्यांचा समावेश आहे . समित्यांमार्फत योग्य नियोजन करण्यात आले असून नियोजनानुसार काम पार पाडले जात आहे . 
 पाच दिवसीय युवारंग महोत्सवात सहभागी संघांचे आगमन व नोंदणी १६ जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी एक या दोन ते पाच या वेळात संघांचे सांस्कृतिक पथसंचलन होणार आहे . शहादा शहरातील स्टेट बँक चौकातील कृषीभवनापासून पथसंचलनास प्रारंभ होईल . मुख्य रस्त्याने बसस्थानक , गांधी पुतळा , नगरपालिका चौकमार्गे खेतिया रस्त्यावरील मिशन बंगला येथे संचलनाची समाप्ती होईल . या पथसंचलनात सहभागी विद्यार्थी वेगवेगळ्या कलाकृती सादर करतील . याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता संघ व्यवस्थापकांची सभा होईल . युवारंगचा उद्घाटन सोहळा १७ जानेवारीला सकाळी १० वाजता ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ तथा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ . अनिल काकोडकर यांच्या हस्ते होईल . अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा . पी . पी . पाटील राहतील . या वेळी मंडळाचे कमलताई पाटील , विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पी . पी . माहुलीकर , व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील . तर पारितोषिक वितरण सोहळा २० जानेवारीला सकाळी १० वाजता होईल . प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येतील . विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव युवारंग २०१९ - २० चा आनंद घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे समन्वयक प्रा . मकरंद पाटील , पी . आर . पाटील , युवारंगचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील , विद्यापीठाचे प्रकुलसचिव डॉ . बी . व्ही . पवार , विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ . सत्यजित साळवे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर . एस . पाटील , युवारंगचे समन्वयक उपप्राचार्य डॉ . एम . के . पटेल यांनी केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने