प्रकाशाचा दीप हरपला, पण त्याच्या किरणांनी दिशा दिली… स्व. चंदन आबा – जनतेच्या हृदयातील अमर दीपस्तंभ 🕯️ संपादकीय : महेन्द्रसिंह राजपूत, मुख्य संपादक – निर्भिड विचार

 


🕯️ प्रकाशाचा दीप हरपला, पण त्याच्या किरणांनी दिशा दिली…

स्व. चंदन आबा – जनतेच्या हृदयातील अमर दीपस्तंभ 🕯️


संपादकीय : महेन्द्रसिंह राजपूत, 

मुख्य संपादक – निर्भिड विचार


दीपावलीचा सण म्हणजे आनंद, ऐक्य, उत्साह आणि प्रकाशाचा पर्व. मात्र याच प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आपण आज त्या तेजोमय व्यक्तिमत्त्वाची आठवण काढतो, ज्याने आपल्या कार्याने, त्यागाने आणि माणुसकीच्या तेजाने समाजाचा मार्ग उजळविला — तो म्हणजे स्वर्गीय चंदन आबा.


चार वर्षांपूर्वीचा तो दिवस अजूनही डोळ्यांसमोर उभा राहतो… समाजसेवेच्या अथक प्रवासात असलेला हा दीप अचानक हरपला आणि अंधार पसरला. पण आश्चर्य म्हणजे, त्याच्या जाण्यानंतरही त्याचा प्रकाश संपला नाही. तो प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात, त्यांच्या ओंजळीत आणि त्यांच्या अश्रूंमध्ये आजही झळकतो. त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आजही आम्ही मित्रपरिवार जागोजागी अनुभवतो. आबा आमच्यात नाही हा भास आम्हाला आजही पेलवत नाही. वारंवार त्यांच्या असण्याची जाणीव आम्हा सर्व मित्र परिवाराला सतत होत असते.


स्व. चंदन आबा हे फक्त एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते — ते जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे कुटुंबवत्सल जनसेवक होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांत, आत्मविश्वासपूर्ण स्मित झळकत असे. संकटकाळात, पूर, दुष्काळ किंवा अपघात असो, ते पहिल्यांदा धावून येणारे पहिले व्यक्तिमत्त्व असत. सामान्य माणसांच्या वेदना त्यांच्या मनात खोलवर उमटत असत. जणू काही त्यांनी आपले जीवन जनसामान्यांसाठी अर्पण केले होते.


त्यांच्या राजकारणात सत्ता किंवा दिखावा नव्हता, तर होती ती सद्भावना, तळमळ आणि माणुसकीची ओढ. त्यांनी अनेकांना रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि आत्मविश्वासाचा दीप दिला. गावागावांत फिरताना त्यांनी कधी माईक नाही, तर माणूस पकडला — त्याच्या मनातला अंधार ओळखून त्या ठिकाणी प्रकाश टाकला. युवकांना आपल्या कार्यातून प्रेरणा दिली एक नवीन विचारांची दिशा दिली.


अनेकदा आपण ऐकतो – “राजकारणी येतात आणि जातात.” पण आबा हे फक्त राजकारणी नव्हते, ते समाजाच्या श्वासात मिसळलेले माणूस होते. त्यांच्या जाण्याने एक युग संपले, पण त्यांचा आदर्श आजही अनेक तरुणांच्या पावलांना दिशा देतो. आजही आबांची विचार आम्हा सर्वांना प्रेरणा देतात.


आज त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, संयम आणि सेवा आठवतो. त्यांनी ज्या प्रकारे शिरपूर, खानदेश आणि जिल्ह्याच्या जनतेच्या हृदयात स्वतःसाठी स्थायी स्थान निर्माण केले, ते कुणालाही विसरता येणार नाही. त्यांच्या साधेपणात सौंदर्य होतं, आणि त्यांच्या कार्यात प्रामाणिकपणा. 


आजही समाजातील असंख्य नागरिक त्यांची आठवण काढतात — “त्या दिवशी आबा असते तर…” अशी हळवी भावना व्यक्त करतात. हेच त्यांच्या कार्याचं खरं यश आहे. 

त्यांनी कोणाच्याही जाती, धर्म, पक्ष, पंथाचा विचार न करता फक्त “माणूस” म्हणून प्रत्येकाशी वागणूक दिली. आपल्या जीवनकारातील नगरसेवक हे पद त्यांनी फक्त भूषवले नाही तर ते गाजवले जनसामान्यांच्या हितासाठी.


त्यांनी दिलेला संदेश आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतो –


> “राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी असावं.

प्रकाश पेटवायचा असेल, तर आधी स्वतः ज्योत बनावी लागते.” त्यांच्या नावात चंदन होते त्याप्रमाणे आयुष्यभर ते चंदनाप्रमाणे सामान्यांसाठी झिजले.


अशा या संकटमोचक, सुज्ञ, माणुसकीचा दीप जपणाऱ्या स्वर्गीय चंदन आबा ज्यांना जीवनात मी माझ्या गुरु मानले, सन 2014 मध्ये निर्भीड विचार या वृत्तपत्राची सुरुवातीची मुहूर्तमेढ देखील त्यांच्याच हस्ते झाली होती. त्यांच्याच विचारांच्या वारसा, सामान्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करण्याची प्रेरणा, आणि सतत सत्याच्या मागोवा, आणि सत्तेच्या विरोधात आवाज बुलंद करण्याची ताकद ही सर्व प्रेरणा आबांकडूनच मिळाले होती. ती सार्थ ठरवण्याच्या पावलो पावली  प्रयत्न आजवर  निर्भीड विचार ने केला. आणि आज तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात आमचे एक वेगळे स्थान वाचकांच्या आणि दर्शकांच्या मनात निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. अशा या आमच्या आदर्श व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणून आजन्म आमच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या आमच्या मित्रास निर्भिड विचार परिवाराकडून त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी श्रद्धांजली. आणि विनम्र अभिवादन..


त्यांचा प्रकाश आजही आपल्या प्रत्येक समाजकार्यात, प्रत्येक जनसेवेच्या प्रयत्नात जिवंत आहे. त्यांच्या आठवणींच्या झरा आज देखील मनामनात तेवत आहे.


त्यांच्या जीवन काळातील आदर्श, त्यांच्या अपूर्ण इच्छा, आणि ज्यांना सामान्यांच्या सेवेसाठी त्यांनी घेतलेला वसा काही प्रमाणात का असेना आम्ही गंगाइ चिल्ड्रन हॉस्पिटल, चंदन आबा युथ फ्रेंड सर्कल, नेताजी परिवार , नातेवाईक आप्तेष्ट आणि मित्रपरिवार या सर्वांच्या सहकार्याने अविरत सुरू ठेवला आहे. आणि हीच आबांना खरी श्रद्धांजली आहे हीच आमच्या सर्वांची मनातील भावना आहे. 


अनेक वर्षे येथील अनेक वर्षे जातील पण चंदन आबांच्या आठवणी या जन्मभर आम्हाला प्रेरणा देत राहतील, आणि आबा आपल्या विचारांनी आणि कार्याने सतत अमर राहतील . 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने