जनसंघर्ष यात्रेतील प्रश्नांसाठी शिरपूर फर्स्ट आक्रमक; विविध विभागांना निवेदन सादर
शिरपूर, प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचा पुढचा टप्पा म्हणून विविध शासकीय विभागांना निवेदने सादर करण्यात आली. 23 मे ते 28 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेदरम्यान 21 गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या होत्या.
यात्रेदरम्यान रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, वीज, सार्वजनिक वाहतूक तसेच शासकीय योजनांमधील अडचणी यांसारख्या अनेक प्रश्नांकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले होते. या सर्व समस्यांच्या अनुषंगाने संबंधित विभागांकडे निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या आहेत.
शिरपूर एसटी आगार प्रमुख वर्षा पावरा यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिरपूर ते रुदावली मार्गावरील एसटी सेवा नियमित सुरू ठेवण्याची आणि दिवसातून किमान दोन फेऱ्या चालविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी नियमाप्रमाणे आठ तास वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. वारंवार निवेदने आणि तक्रारी करूनही अनेक भागांत अपुरा वीजपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अनेक गावांमध्ये अस्वच्छता, उघड्या गटारी आणि स्वच्छतेबाबत होत असलेल्या दुर्लक्षामुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढल्याचे नमूद करण्यात आले. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत व ग्रामसेवकांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात 'च्यवनप्राश' देण्यात आला.
तसेच नायब तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात लाडकी बहीण योजना तसेच महिला कल्याणाशी संबंधित विविध योजनांसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
जनसंघर्ष यात्रेदरम्यान समोर आलेल्या सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी शिरपूर फर्स्ट सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आगामी काळात रेशन व्यवस्था, खत-बियाणे उपलब्धता तसेच विविध शासकीय योजनांमधील त्रुटींविरोधातही आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
निवेदन सादर करताना शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दहिवद, तरडी, हिंगोणीसह विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShirpurFirst #JansangharshYatra #ShirpurNews #DhuleNews #MaharashtraNews #RuralIssues #STBusService #Mahavitaran #FarmersIssues #VillageDevelopment #CleanVillage #LadkiBahinYojana #PublicIssues #LocalNews #NirbhidVichar
शिरपूर फर्स्ट, जनसंघर्ष यात्रा, शिरपूर, धुळे, ग्रामविकास, शेतकरी, महावितरण, एसटी सेवा, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, लाडकी बहीण योजना, महिला कल्याण, स्वच्छता अभियान, ग्रामीण समस्या, आंदोलन, महाराष्ट्र बातम्या, स्थानिक प्रशासन, जनआंदोलन, ग्रामीण विकास, निर्भीड विचार.
