जोयदा; कृष्णानगर येथे 5 शेळ्यांचा खात्मा तर पवनखुटी येथे वीज पडून बैलाचा मृत्यु
प्रतिनिधी, शिरपूर
शेतीकामाची लगबग आणि हातात पैसे नसल्याच्या कठीण समयी जोयदा गावातील शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गावातील कृष्णानगर येथे पहाटेच्या सुमारास वन्य प्राण्याने कुडाचे घर तोडून 5 शेळ्यांचा खात्मा केला. तर सायंकाळी झालेल्या वादळी पावसात पवनखुटी येथे वीज पडून बैल मृत्युमुखी पडला.
सविस्तर माहीती अशी की जोयदा गावातील कृष्णानगर येथे दिनांक 27 जून ला पहाटे 3-4 च्या सुमारास भागडा सुरबान पावरा यांचे कुडाचे घर तोडून 4 बोकड आणि 1 शेळी असे मिळून 5 शेळ्यांचा वन्य प्राण्याने खात्मा केला. घरातून काढून ठराविक अंतरावर एकेक बोकडांना ठार करून अर्धवट मांस खावून सोडून दिले. हा हल्ला -2-3 वन्य प्राण्यांनी मिळून केला असल्याचा अंदाज आहे. सदर घटनेत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे 50 हजाराचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान वन विभागाने तात्काळ दखल घेवून पंचनामा करून घेतला. तर गावातीलच पवनखुटी पाड्यावर दिनांक 27 रोजी झालेल्या सायंकाळी 6 च्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज पडून केसरसिंग तिख्या पावरा यांचा बैल जागीच ठार झाला. यामुळे परीसरातून हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्याचे 40 हजाराचे नुकसान झाले असून शेतीकामाच्या लगबगीत बैल मेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. महसूल विभाग आणि पशु वैद्यकीय विभागाने तात्काळ दखल घेवून पंचनामा आणि पीएम करून घेतला. दोघाही शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीती याचना केलेली आहे.
