शिरपूर तालुक्यात पोलिसांची धडक कारवाई : तीन गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद
📰 बातमी
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत तीन गावठी बनावटीचे कट्टे (पिस्टल), सहा जिवंत काडतुसे आणि दोन अतिरिक्त मॅगझीनसह दोन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम मध्यप्रदेशातील उमटीकडून आंबे मार्गे शिरपूरकडे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन येत आहेत. याची माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलिस पथकाने सापळा रचला.
खंबाळे-आंबे रस्त्यावर आंबे गावाबाहेरील दगडी बाकड्याजवळ दोन संशयित इसम दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे विकास उर्फ पल्लराम मनोज घारू (वय ३०, रा. बाजीराव नगर, येवला, जि. नाशिक) आणि रावसाहेब अशोक मोरे (वय २९, रा. निमगाव, ता. येवला, जि. नाशिक) अशी आहेत.
दोघांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून तीन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत 7.65 एम.एम. काडतुसे आणि दोन अतिरिक्त मॅगझीन असा शस्त्रसाठा आढळून आला.
या प्रकरणी पोहेकॉ विजय ढिवरे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६७/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली.
#Shirpur #DhulePolice #CrimeNews #BreakingNews #NirbhidVichar #MaharashtraNews #ArmsAct #PoliceAction #ShirpurCrime
