बोराडीत लोकवर्गणीतून भव्य शिवमारुती मंदिर; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने गावात भक्तिमय वातावरण

 


बोराडी (ता. शिरपूर) – शिरपूर शहराच्या विकासासोबतच बोराडी गावातही विविध विकासकामांना गती मिळत असून उपसरपंच राहुल रंधे यांच्या नेतृत्वाखाली गाव प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गावातील लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य शिव–मारुती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण बोराडी गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले.

राजस्थानी शैलीतील आकर्षक वास्तूशैलीत उभारण्यात आलेले हे मंदिर अत्यंत भव्य, सुंदर आणि मन प्रसन्न करणारे असून गावाचे नवे आध्यात्मिक केंद्र ठरत आहे. या मंदिरामुळे ग्रामस्थांमध्ये श्रद्धा, एकात्मता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

बोराडीचे नाव दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न – अमरिशभाई पटेल

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी बोलताना माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी सांगितले की, बोराडी गावाला कर्मवीर आण्णासाहेबांचा प्रेरणादायी वारसा लाभलेला आहे. हा वारसा रंधे कुटुंबीय निष्ठेने पुढे नेत असून त्यांच्या नेतृत्वामुळे गावाचा विकासाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. भविष्यात बोराडी गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंदिर वास्तूपूजन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते, शिवलिंग स्थापना माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, हनुमान मूर्ती स्थापना आमदार काशीराम पावरा, कलश यात्रा पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तर देव मोगरा माता मंदिर प्रतिष्ठा मिठगाव आमलाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.

मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती

कार्यक्रमाला शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष भरत पाटील, योगेश बादल, विरपाल राजपूत, माधवराव पाटील, निशांत रंधे, आशाताई रंधे, सीमाताई रंधे, रोहित रंधे, सत्तारसिंग पावरा, डॉ. हिरा पावरा यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

७०–८० वर्षे जुन्या मंदिराचा ग्रामस्थांनी केला जीर्णोद्धार

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे ७० ते ८० वर्षे जुने असून कालांतराने ते जीर्ण अवस्थेत आले होते. त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेत लोकवर्गणी जमा केली. ग्रामस्थांनी आर्थिक मदत आणि श्रमदान करून मंदिर उभारणीचे कार्य पूर्ण केले.

कलश यात्रेने सोहळ्याची भव्य सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात कलश यात्रा व ध्वजारोहणाने करण्यात आली. गावातील महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या उत्साहात कलश यात्रा काढली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात निघालेल्या यात्रेमुळे संपूर्ण गाव शिवमय झाले.

इंदौर येथून आणलेल्या आकर्षक झाक्यांमध्ये राधाकृष्ण व हनुमान यांच्या सादरीकरणाने उपस्थित भाविकांचे मन मोहून टाकले. ढोल-ताशा, बँड आणि पारंपरिक वाद्यांमुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.

वेदमंत्रांच्या गजरात धार्मिक विधी

दुसऱ्या दिवशी सकाळी वेदमंत्रांच्या गजरात गणपती पूजन, पुण्याहवाचन, मांडवपूजन, नवग्रह शांती, आचार्य पूजन आणि रुद्राभिषेक असे धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर शिवलिंग आणि श्री हनुमान मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

सायंकाळी आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. उमेश महाराज दशरते यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनातून अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिवमारुती मंदिर सेवा समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

विशेष म्हणजे या मंदिराची संकल्पना व कार्यक्रमाचे आयोजन उपसरपंच राहुल रंधे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला, युवक आणि ज्येष्ठ ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले.

या सोहळ्यामुळे बोराडी गावात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीची भावना अधिक दृढ झाली असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन उभारलेल्या या भव्य मंदिराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने