पंचनामे झाले, पण मदत नाही : शिरपूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात मदत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

 


पंचनामे झाले, पण मदत नाही : शिरपूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात


मदत न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा


सविस्तर बातमी


शिरपूर (प्रतिनिधी) : शिरपूर तालुक्यात २७ जानेवारी रोजी झालेल्या जोरदार अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे भाटपुरा, अजनाड, सावेर आणि थाळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केळी, गहू, हरभरा यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असले तरी अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे तात्काळ वाढीव नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शिरपूर तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गारपिटीमुळे विशेषतः केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या असून शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा बोजा आहे. केळी नुकसानभरपाईच्या स्रीगरचे निम्मे पैसे अद्याप होळनांथे मंडळाला मिळालेले नाहीत, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच होळनांथे स्रीगर संदर्भात झालेल्या अनियमिततेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचनामे होऊनही मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हताश झाले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मागण्यांना विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. शिरपूर फर्स्ट, अनुभव युवा मंच तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना समर्थन देत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, लवकरात लवकर मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा येत्या आठवड्यात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात येईल.

गारपीटीनंतरही मदत न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने