बंजारा आरक्षण अभ्यास समिती रद्द करा; जळीतग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – बिरसा आर्मीची मागणी
प्रतिनिधी | शिरपूर
बंजारा समाजाला आदिवासी आरक्षणात सामावून घेण्याच्या संदर्भात राज्य शासनाने नेमलेली अभ्यास समिती तात्काळ रद्द करावी, तसेच जातीयवादी मानसिकतेतून त्रास दिल्याचा आरोप असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि तालुक्यातील जळीतग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बिरसा आर्मीने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, आदिवासी विकास मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाने बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली आहे. मात्र ही समितीच मूळात बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचा आरोप बिरसा आर्मीने केला आहे. यापूर्वी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी बंजारा समाज आदिवासी नसल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा अभ्यास समिती स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय? असा सवाल बिरसा आर्मीने उपस्थित केला आहे. बंजारा समाज आदिवासी समाजासाठी असलेले निकष पूर्ण करत नसून त्यांना स्वतंत्र तीन टक्के आरक्षण आधीच देण्यात आलेले आहे. त्यामुळे आदिवासी आरक्षणात त्यांचा समावेश करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये आणि स्थापन केलेली समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाड येथे कार्यरत असलेले आदिवासी समाजाचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीयवादी मानसिकतेतून त्रास दिला जात असल्याचा आरोपही बिरसा आर्मीने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय शिरपूर तालुक्यातील उमरपाडा (चाकडू), भोईटी आणि वकवाड या गावांमध्ये शेतकऱ्यांनी कापणी करून एका ठिकाणी साठवून ठेवलेल्या गहू व हरभरा पिकांना अज्ञात कारणांमुळे आग लागून मोठे नुकसान झाले आहे. उमरपाडा येथे सुमारे २५ क्विंटल गहू आणि ५ क्विंटल हरभरा, भोईटी येथे २० क्विंटल गहू तर वकवाड येथे ४५ क्विंटल गहू जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना शासनाकडून तातडीची आपत्कालीन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बिरसा आर्मीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी मनोज पावरा, कैलास पावरा, चुनिलाल पावरा, सुरेश पावरा आदी उपस्थित होते.
