शिरपूरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ची जोरदार पूर्वतयारी
विद्यार्थ्यांना डोमिसाइल, नॅशनलिटी व जात प्रमाणपत्रे देण्यासाठी शाळा प्रशासनाला मार्गदर्शन
शिरपूर | दि. 26 फेब्रुवारी 2026
शिरपूर तालुक्यात राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान’ अंतर्गत होणाऱ्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज तहसील कार्यालय, शिरपूर येथे पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य उपस्थित होते.
अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डोमिसाइल (रहिवासी दाखला), नॅशनलिटी (राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र) आणि जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शिबिरामध्ये कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज प्रक्रिया कशी सुलभ करावी, विद्यार्थ्यांकडून आवश्यक माहिती वेळेत कशी संकलित करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचा लाभ मिळावा यासाठी शाळास्तरावर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अर्जांमधील त्रुटी टाळण्यासाठी कागदपत्रांची अचूकता व पडताळणी यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी तहसीलदार महेंद्र माळी यांनी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे हे अभियान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
बैठकीस नायब तहसीलदार मगर तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सर्व शाळांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असून, प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन सुरू केले आहे.
