धनादेश अनादर प्रकरणी शिरपुर न्यायालयाचा कडक आदेश; आरोपीस ३ महिने सक्तमजुरी व ८० हजारांचा दंड
शिरपुर | प्रतिनिधी
मैत्रीच्या संबंधातून बिनव्याजी हात उसने दिलेली रक्कम परत न केल्याप्रकरणी शिरपुर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत कडक शिक्षा सुनावली आहे. चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अंतर्गत दाखल प्रकरणात न्यायालयाने आरोपीस तीन महिने सक्तमजुरी व फिर्यादीस एकूण ८० हजार रुपयांचा दंड देण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी उदय शिवदास न्हावळदे (रा. शिरपुर) यांनी आरोपी चंद्रशेखर भगवानदास जैन (रा. शिरपुर) यास मैत्रीच्या नात्यातून बिनव्याजी हातउसने म्हणून ४०,००० रुपये दिले होते. सदर रक्कम परत करण्यासाठी आरोपीने फिर्यादीस प्रत्येकी २०,००० रुपयांचे दोन धनादेश दिले. मात्र, आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे हे दोन्ही धनादेश अनादर होऊन परत आले.
यामुळे फिर्यादी उदय न्हावळदे यांनी शिरपुर न्यायालयात S.C.C. No. 464/2020 अन्वये आरोपीविरुद्ध चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अंतर्गत दावा दाखल केला होता. सदर प्रकरणाची सखोल चौकशी व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.
या निकालात शिरपुर न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पुजा नारायण कोकाटे यांनी आरोपी चंद्रशेखर भगवानदास जैन यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, आरोपीने दिलेल्या प्रत्येकी २०,००० रुपयांच्या दोन धनादेशांसाठी प्रत्येकी ४०,००० रुपये याप्रमाणे एकूण ८०,००० रुपये दंडाची रक्कम फिर्यादीस अदा करण्याचे आदेश दिले आहेत. सदर दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस सहा महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणात फिर्यादींच्या बाजूने अॅड. नरेश बी. शर्मा (शिरपुर) यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले. या निकालामुळे चेक अनादर प्रकरणात न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून, आर्थिक व्यवहारात विश्वासघात करणाऱ्यांना कायद्याचा फटका बसतो, असा स्पष्ट संदेश समाजाला मिळाला आहे.
