बातमी
दहिवद (प्रतिनिधी):
दहिवद गाव व शिवार परिसरात बिबटे, तरस तसेच इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना शेतकरी भीतीच्या छायेत वावरत आहेत. काही ठिकाणी बिबट्याने पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या घटनाही घडल्या असून त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
वन्य प्राण्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतात वस्ती करण्यास कोणीही तयार नसून शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्या दहिवद शिवारातील शेती पंपांसाठी रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना अंधारात जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर दहिवद गाव व शिवारातील शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाकडे निवेदन देत रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची ठाम मागणी केली आहे. शेजारील इतर फिडरवरील ग्रामीण भागात दिवसा वीज पुरवठा केला जात असताना, केवळ दहिवद सबस्टेशनमधून निघणाऱ्या शेती पंपांना रात्री वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दिवसा वीज पुरवठा झाल्यास शेतकरी सुरक्षितपणे पाणी भरणे व इतर शेती कामे करू शकतील, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. निवेदन दिल्यानंतर तात्काळ निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला असून, त्यातून होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
