शिरपूर तहसील कार्यालयात सामाजिक अर्थसहाय्य योजनांना गती
संजय गांधी योजने सह पाच योजनांतील ५४२ लाभार्थ्यांना मंजुरी
📰 बातमी
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील गरजू, निराधार, ज्येष्ठ नागरिक व विधवा महिलांसाठी दिलासादायक बातमी असून सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत एकूण ५४२ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
याबाबत दि. १ जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय शिरपूर येथे बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत योजनानिहाय लाभार्थ्यांची मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत १६२, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती योजना अंतर्गत २५७, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना अंतर्गत ६८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना अंतर्गत २९, तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत २६ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
एकूण मंजूर लाभार्थ्यांची संख्या ५४२ इतकी आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आपले मंजूर आदेश सेतु केंद्रातून प्राप्त करून घ्यावेत. तसेच अनुदान लवकर सुरू होण्यासाठी मंजूर आदेशाची प्रत, बँक पासबुकची छायांकित प्रत व अद्ययावत आधार कार्डाची छायांकित प्रत तहसील कार्यालय शिरपूर येथील संजय गांधी शाखेत जमा करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सदर माहिती तहसीलदार, शिरपूर यांनी दिली असून, लाभार्थ्यांना वेळेत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
