आई जास्त कमावत असली तरी मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी वडिलांचीच : दिल्ली हायकोर्ट
📰 बातमी
नवी दिल्ली | प्रतिनिधी
मुलांच्या पालनपोषणाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक निरीक्षण नोंदवत दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे की, आईचे उत्पन्न जास्त असले तरीही मुलांच्या पालनपोषणाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी वडिलांचीच असते. पत्नी अधिक कमावत असल्याचे कारण देत वडील ही जबाबदारी टाळू शकत नाहीत, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले.
एका कौटुंबिक वादाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. मुलांचे संगोपन, शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही वडिलांवर आहे, असे सांगत न्यायालयाने समाजातील चुकीच्या मानसिकतेवरही बोट ठेवले.
कोर्टाने पुढे असेही स्पष्ट केले की, नोकरी करणाऱ्या मातांवर केवळ त्या कमावतात म्हणून शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक दबाव टाकता येणार नाही. महिलांवर दुहेरी जबाबदारी लादणे हे अन्यायकारक असून ते संविधानातील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे, असेही न्यायालयाने बजावले.
या निर्णयामुळे काम करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला असून, मुलांच्या पालनपोषणाबाबत वडिलांची जबाबदारी अधोरेखित झाली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे भविष्यात अशा प्रकरणांमध्ये महत्त्वाचा न्यायनिवाडा म्हणून याकडे पाहिले जात आहे.
