शिरपुरात भक्तीचा महोत्सव : भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
शिरपुर | प्रतिनिधी
श्रीगुरु तुकाराम महाराज नथूसिंगबाबा संस्थापित अध्यात्मिक ज्ञान प्रचार दौरा मंडळाच्या वतीने शिरपुर शहरात भव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा भगवंत पार्क, स्वामीनारायण मंदिराजवळील शेजारी, वरझडी रोड, शिरपुर (जि. धुळे) येथे संपन्न होत आहे.
हा अखंड हरिनाम सप्ताह मिती पौष शुद्ध ७ (शनिवार, २७ डिसेंबर २०२५) पासून सुरू होऊन मिती पौष शुद्ध १५ (शनिवार, ०३ जानेवारी २०२६) पर्यंत चालणार आहे. दररोज सकाळ व सायंकाळी हरिनाम, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत व वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि संतपरंपरेचे अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. श्री ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी, श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे, श्री ह.भ.प. जगदीश महाराज जोशी, श्री ह.भ.प. पांडुरंग महाराज गुंडे, श्री ह.भ.प. गोविंद महाराज वरसाडेकर, श्री ह.भ.प. तुकाराम महाराज बारसाटीकर, श्री ह.भ.प. बाजीराव महाराज चांदले तसेच समारोप प्रसंगी श्री ह.भ.प. भरत महाराज जुगाडकर यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे.
दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी हरिपाठ, दुपारी प्रवचन व सायंकाळी हरिनाम कीर्तन अशी भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. विशेषतः युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अध्यात्मिक प्रबोधनाचा हा सप्ताह मार्गदर्शक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून शांती, समाधान, भक्ती आणि अध्यात्माचा संदेश ‘एका छताखाली’ देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. शिरपुर शहरासह तालुक्यातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तीमय पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

