दोंडाईच्याच्या दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाची शेगाव तीर्थसहल भक्ती, आपुलकी व आनंदात संपन्न
दोंडाईचा– येथील दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाची दि. १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी विदर्भातील सुप्रसिद्ध शेगाव तीर्थक्षेत्रास दोन दिवसीय सहल अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. पी. गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. आर. सी. रामोळे (सेवानिवृत्त जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी) आणि श्री. तुकाराम वाडिले (सेवानिवृत्त निरीक्षक, आदिवासी विकास विभाग) यांच्या नेतृत्वाखाली ही सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीदरम्यान जेष्ठ नागरिकांनी यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मनुदेवी तीर्थक्षेत्र, नांदुरा येथील १०५ फूट उंच उभा मारोती, शेगाव येथील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिर, नागझरी तीर्थक्षेत्र, मुक्ताईनगर येथील मुक्ताई मातेचे मंदिर तसेच तापी–पूर्णा नदी संगमावरील प्राचीन चांगदेव महाराज मंदिर या पवित्र व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. या ठिकाणांची अध्यात्मिक व ऐतिहासिक माहिती सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी यांनी वेळोवेळी मनोगताद्वारे जेष्ठांना समजावून सांगितली. सहलीच्या परतीच्या प्रवासात मुक्ताईनगर जेष्ठ नागरिक संघ व मुक्ताई महिला जेष्ठ नागरिक संघाला भेट देण्यात आली. तेथील अध्यक्ष आदरणीय रमेश जोगी साहेब व आदरणीय राजकन्या जोगी ताई साहेब तसेच त्यांच्या कार्यकारिणी सदस्यांनी दोंडाईच्याच्या जेष्ठ नागरिकांचे अत्यंत स्नेहपूर्वक स्वागत केले. सहभागी वीस जेष्ठ नागरिकांचे गुलाबपुष्प, औक्षण करून स्वागत करण्यात आले तसेच नाश्ता व चहापाण्याचा उत्तम पाहुणचार करण्यात आला. या आपुलकीच्या सत्काराने दोंडाईचेकर जेष्ठ नागरिक भारावून गेले. मुक्ताईनगर जेष्ठ नागरिक संघ व महिला जेष्ठ नागरिक संघाकडून मिळालेला आदरातिथ्य व सेवा इतर संघटनांसाठी निश्चितच अनुकरणीय असल्याचे मत सहलीतील सहभागी जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. सहल संपूर्ण काळात खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदात व समाधानकारकपणे पार पडली. थोडक्यात, दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघाची शेगाव तीर्थसहल सर्वार्थाने यशस्वी ठरली, असे गौरवोद्गार समारोपप्रसंगी जेष्ठ नागरिकांनी काढले.
